महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना रोजगारसंधी देण्याबरोबरच उद्योग क्षेत्राला मनुष्यबळ मिळावे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘महाजॉब्स’ला पहिल्याच दिवशी महाप्रतिसाद मिळाला. या संकेतस्थळावर मंगळवारी तब्बल ८८,४७३ उमेदवारांनी नोकरीसाठी, तर ७५१ कंपन्यांनी नोकरभरतीसाठी नोंदणी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाळेबंदीमुळे लाखो परप्रांतीय कामगार गावी गेले. राज्यात कामगारांच्या तुटवडय़ामुळे अनेक कारखाने सुरू होऊ शकलेले नाहीत, तर अनेकांना अपुऱ्या मनुष्यबळावर काम भागवावे लागत आहे. दुसरीकडे, मंदीमुळे अनेक बेरोजगार नोकरीच्या शोधात आहेत. त्यामुळे उद्योगांची कामगारांची गरज आणि बेरोजगारांना कामाची संधी देण्यासाठी मध्यस्थ म्हणून उद्योग विभागाच्या ‘महाजॉब्स’ या संकेतस्थळाचे सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

राज्यातील इच्छुक उमेदवारांनी पहिल्याच दिवशी ‘महाजॉब्स’ला मोठा प्रतिसाद दिला. मंगळवारी ८८,४७३ उमेदवारांनी नोकरीसाठी नोंदणी केली. तसेच मनुष्यबळाच्या शोधात असलेल्या ७५१ कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची मागणी नोंदवली. टाळेबंदीच्या काळात बेरोजगारीत वाढ झाल्याचे उमेदवारांच्या नोंदणीतून स्पष्ट होत असले तरी रोजगार उपलब्ध असल्याचेही कंपन्यांनी केलेल्या नोंदणीतून दिसून येते.

‘महाजॉब्स’ प्रणालीच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी व योजनेच्या प्रभावी संचालनासाठी ‘एमआयडीसी’ने एक कक्ष तयार करावा, असे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असलेल्यांनाच या संके तस्थळाच्या माध्यमातून रोजगार मिळवून दिले जाणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

उद्योग विभागाने केलेल्या पाहणीत राज्यातील उद्योगांमध्ये ५० हजार रोजगार तातडीने उपलब्ध आहेत. त्यामुळे या संकेतस्थळाच्या माध्यमातून नोकरी मागणारे आणि देणारे यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात येत आहे. ‘महाजॉब्स’ पोर्टलद्वारे अभियांत्रिकी, लॉजिस्टिक, रसायने आदी १७ क्षेत्रांची निवड करण्यात आली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Great response to mahajobs on the first day abn