भारतातील सर्वश्रेष्ठ वास्तुरचनाकार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले गेलेले ज्येष्ठ नगररचनातज्ज्ञ चार्ल्स कोरिया (८४) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी रात्री निधन झाले. उत्तमोत्तम वास्तुरचना करतानाच किफायतशीर व जीवनशैली उंचावणाऱ्या घरांच्या मांडणीचे श्रेय त्यांना जाते. नवी मुंबईचे मुख्य नगररचनाकार म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
महात्मा गांधी यांचा साबरमती आश्रम, जयपूर येथील जवाहर कला केंद्र, मध्य प्रदेश येथील विधानभवन, दिल्लीचे हस्तकला संग्रहालय यासह जगभरातील अनेक वास्तुंची रचना त्यांच्या हातांतून साकारली होती. ७० च्या दशकात नवी मुंबईची संकल्पना उदयाला येत असताना त्यांनी मुख्य नगररचनाकार म्हणून नवी मुंबईचे काम पाहिले होते. वास्तुरचनांचा आदर्शपाठ घालून देत असतानाच निम्न आर्थिक गटातील लोकांची जीवनशैली सुधारण्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी किफायतशीर गृहप्रकल्पांची मांडणी केली. नागरी राष्ट्रीय परिषदेचे ते पहिले अध्यक्ष होते. सिकंदराबाद येथे १ सप्टेंबर १९३० रोजी जन्मलेल्या कोरिया यांनी महाविद्यालयीन शिक्षण सेंट झेविअर्समध्ये पूर्ण केले. त्यानंतर प्रसिद्ध मिशिगन विद्यापीठ आणि मॅसेच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे त्यांनी शिक्षण घेतले. भारतात व जगभरातही अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी वास्तुरचनेचे धडे दिले. जपान तसेच इंग्लंडनेही त्यांचा प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मान केला. रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्सने भारतातील सर्वात मोठे वास्तुरचनाकार म्हणून त्यांना नावाजले. भारत सरकारने १९७२ मध्ये पद्मश्री व २००६ मध्ये पद्मविभूषण देऊन त्यांचा सन्मान केला. पर्यावरण आणि नागरी वसाहती यांचा एकत्रित विचार करून वास्तूरचना शिकवण्यासाठी त्यांनी ‘अर्बन डिझाइन रिसर्च इन्स्टिटय़ूट’ची स्थापना केली.

Story img Loader