कुलदीप घायवट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील विद्युत तारांवर झुलणारे हिरव्या रंगाचे, दूरून पोपटासारखे पक्षी दिसतात. या पक्ष्याचे नाव ‘वेडा राघू’. तारांवर एका ओळीत बसलेले, मध्येच भरारी घेत भक्ष्य पकडून पुन्हा मूळ ठिकाणी बसणारा ‘वेडा राघू’ पुन्हा-पुन्हा तीच क्रिया करतो. त्याच्या अस्वस्थता व उगाच उडय़ा मारण्याच्या प्रवृत्तीमुळे आणि पोपटाचा रंग असल्याने त्याला ‘वेडा राघू’ हे नाव पडले असावे. ‘वेडा राघू’ला ‘किवंडा पोपट’, ‘पाणपोपट’ या नावानेही ओळखले जाते. तसेच त्याला इंग्रजीत ‘ग्रीन बी ईटर’ म्हटले जाते.

हिरवा रंग आणि खाद्य म्हणून आवडणारी मधमाशी यामुळे त्याला ‘ग्रीन बी ईटर’ हे नाव पडले असावे.  चिमणीच्या आकाराच्या ‘वेडा राघू’चे शास्त्रीय नाव ‘मेरॉप्स ओरिएंटॅलिस’ आहे. त्याची शरीरयष्टी सडपातळ आणि शेपटी लांब असते. शेपटीला मधोमध दोन मोठय़ा सुयांसारखी पिसे असतात. त्याची संपूर्ण शरीराची लांबी सुमारे २३ सेंमीपर्यंत असते. नर आणि मादी दिसण्यास सारखीच असतात. वेडा राघूच्या शरीराचा रंग हिरवा असतो. डोक्याच्या वरील भाग सोनेरी – पिवळट – तपकिरी रंगाचा असतो. चोचीच्या खाली निळय़ा रंगाची छटाअसतो. तर गळय़ावर आडवा काळा पट्टा असतो. चोच लांब, बारीक, काळी आणि थोडी बाकदार असते. डोळे लालभडक आणि पाय काळसर रंगाचे असतात.

हेही वाचा >>> मुंबई-जीवी:भारुड,अभंगातील टिटवी

‘वेडा राघू’चे उष्ण कटिबंधातील बहुतेक सर्व देशांमध्ये वास्तव्य आहे. श्रीलंका, म्यानमार, थायलंड या देशांतही तो सापडतो. हिमालयाच्या सुमारे १,५२५ मीटर उंचीपासून खाली सर्व परिसरात हा पक्षी आढळतो. खुल्या मैदानी प्रदेशात, शेत, पडीक जमीन, बागा, जंगलातील उघडय़ा जागेत दिसून येतो. मुंबईतील घराच्या सभोवतालच्या बागेत, उद्यानात, खाडी क्षेत्राच्यालगत दिसून येतात. वेडा राघू जोडीने किंवा समूहाने राहतो. सायंकाळच्या वेळी हे पक्षी मोठय़ा थव्याने विजेच्या तारेवर ओळीने बसलेले आढळतात. या ठिकाणी बसून ते भक्ष्याची टेहळणी करीत असतात आणि उडत असलेली एखादी माशी किंवा किडा टिपतात. उडताना ‘टिट टिट’ किंवा ‘ट्री ट्री ट्री’ असा आवाज काढतात.

हेही वाचा >>> मुंबई-जीवी : पाणबुडय़ा पाणकावळा

या पक्ष्यांचे प्रमुख खाद्य मधमाशी आहे. मधमाशांबरोबर टोळ, फुलपाखरे, पावसाळी किडे व इतर कीटकही हा पक्षी खातो. ‘वेडा राघू’ अणुकुचीदार चोचीने हवेत उडणारे कीटक टिपण्यात निपुण असतो. दिवसभर कीटक खाऊन झाल्यानंतर शेकडोंच्या संख्येने ते मनुष्यवस्ती किंवा एखाद्या जलाशयाच्या जवळील डेरेदार झाडावर राहतात. झाडावर बसून खूप गोंगाट करतात. तर अंधार पडल्यानंतर निवांत झोपतात. विणीचा हंगामात हे पक्षी उंच टेकडय़ांमधून किंवा खोदकाम केलेल्या मातीच्या भिंतीमध्ये, एखाद्या दरडीत, जमिनीमध्ये सुमारे एक मीटर लांबीच्या अंतराचे छिद्र पाडून बोगदा तयार करतात. तेच त्यांचे घरटे असते. यात मादी तकतकीत पांढऱ्या रंगाची अंडी घालते. अंडी उबविणे व पिलांना खाऊ घालणे ही कामे नर आणि मादी दोघेही करतात. कीटकभक्षक असल्याने हे पक्षी कीटकांचीसंख्या आटोक्यात आणण्याचे काम करतो. त्यामुळे ‘वेडा राघू’चे अन्नसाखळी आणि जैवविविधतेत अनन्य साधारण महत्त्व आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Green bee eater bird information green bee eater bird in mumbai zws
Show comments