तांत्रिक बिघाड, मेगाब्लॉक यांसारख्या कारणांमुळे लोकल ट्रेन्सला होणारा उशीर हा आता मुंबईकरांच्या अंगवळणीच पडला आहे. परंतु, मुंबईकरांच्या औत्स्युकाचा विषय असणारी मेट्रो रेल्वेलासुद्धा पहिल्याच दिवशी या समस्येचा सामना करावा लागला. मुंबई-वर्सोवा या पहिल्या टप्प्यातील मेट्रो रेल्वेचे आज (रविवार) मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. त्यावेळी अनेक मंत्री, खासदार, आमदार, पत्रकार, अधिकाऱ्यांनी पहिल्या मेट्रो सफरीची मजा अनुभवली. हा सगळा लवाजमा घेऊन, बरोब्बर २१ मिनिटांत मेट्रो घाटकोपरला पोहोचली, तेव्हा सगळ्यांच्याच चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता.
मेट्रो रेल्वे दुपारी एक वाजल्यापासून मुंबईकरांच्या सेवेत रुजू करण्यात आली. त्यानंतर मेट्रोच्या पहिल्या प्रवासाचे स्वप्न उराशी बाळगत अनेक मुंबईकर मेट्रोत दाखल झाले. परंतु, पहिल्याच फेरीत तिचा खोळंबा झाला आणि मुंबईकरांच्या आनंदावर विरजण पडले. मुख्यमंत्र्यांना घेऊन घाटकोपरला पोहोचलेली मेट्रो दुपारी एक वाजता प्रवाशांना घेऊन निघाली आणि जवळच्याच जागृती नगर स्टेशनावर बंद पडली. तांत्रिक बिघाडामुळे आपली गाडी बंद पडल्याचं कळल्यावर सगळेच वैतागले. त्यामुळे मेट्रो रेल्वेसुद्धा आता लोकल ट्रेन्सचा कित्ता गिरवणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा