विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापविण्यासाठी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या, आमदार पंकजा मुंडे यादेखील सुमारे तीन हजार किलोमीटरची संघर्ष यात्रा काढून निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. विदर्भात या यात्रेची सुरुवात होणार असून मराठवाडय़ात तिची सांगता होईल. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात ही यात्रा जाणार असून किमान १०० ते १२० विधानसभा मतदारसंघातून या यात्रेचा प्रवास होणार आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी १९९५ मध्ये संघर्ष यात्रा काढून महाराष्ट्र ढवळून काढला. त्यानंतर भाजप-शिवसेना युतीची सत्ता आली. त्याच धर्तीवर या यात्रेची रुपरेषा ठरविण्यात आली आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून निवडणुकीच्या रणमैदानात उतरल्याची भूमिका मांडत कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणण्यासाठी पंकजा मुंडे प्रयत्न करणार आहेत. सभा व मेळाव्यांमधून भाजपला पोषक वातावरण तयार करण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या महिनाअखेरीस शक्यतो गणेश चतुर्थीपूर्वी या यात्रेची सुरुवात करण्याचे नियोजन आहे. ही यात्रा काढण्यास पक्षातील काही नेत्यांचा विरोध असल्याची चर्चा होती. पण आता प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते विनोद तावडे हे या यात्रेची घोषणा सोमवारी करणार आहेत. त्यामुळे पक्षनेतृत्वानेही आता यात्रेला हिरवा झेंडा दाखविला आहे. भाजपचे काही नेतेही या यात्रेत काही दिवस सहभागी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा