लोकसत्ता आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा उपक्रम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संस्कृतीत सण आणि निसर्ग हातात हात घालून येतात. प्रत्येक सणाचा पर्यावरणाशी जवळचा संबंध असतो. गणेशोत्सव हा तर सणांचा राजा. त्यामुळे गणेशोत्सावातील अनेक परंपरा पर्यावरणस्नेहाचा संदेश देतात. या संस्कृतीशी जवळीक साधत ‘लोकसत्ता’ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी ‘ग्रीन सोसायटी अभिनव संकल्प स्पर्धा २०१८’चे आयोजन केले आहे. त्यामुळे पर्यावरण जोपासतानाच या स्पर्धेतून तब्बल १० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची पारितोषिके जिंकण्याचीही संधी उपलब्ध झाली आहे.

वैयक्तिक स्तरावर पर्यावरण रक्षणासाठी नेमके काय करता येईल, याचे भान बाळगणे आणि त्या दृष्टीने विचार करणे गरजेचे आहे. पर्यावरण रक्षणाबद्दल एकूणच समाजमनात केवळ वैचारिक नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून जागृती व्हावी, या उद्देशाने घरगुती कचऱ्याची (ओला कचरा, सुका कचरा, ई-कचरा) शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून समृद्ध पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायटी, संकुले, शैक्षणिक संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सोसायटी पातळीवर कचऱ्याचे प्रमाण कमी करणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे, त्यावर प्रक्रिया करणे, कचऱ्याचा पुनर्वापर करण्यासाठी विविध पद्धती अवलंबणे, शून्य कचरा मोहीम, थर्माकोल व प्लास्टिक मुक्ती, बायोगॅसनिर्मिती प्रकल्प, खतनिर्मिती यांपैकी कोणत्याही मार्गाचा अवलंब करून कचरा व्यवस्थापन करणारी सोसायटी, संकुले, शैक्षणिक संस्था या स्पर्धेसाठी पात्र ठरतील.

कोण सहभागी होऊ शकते?

या स्पर्धेत मुंबई (मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, वसई-विरार, पालघर, मीरा-भाईंदर, उल्हासनगर आणि पनवेल महानगरपालिका परिक्षेत्र) पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर आणि नाशिक या शहरांतील गृहनिर्माण सोसायटय़ा, संकुले, शैक्षणिक संस्था यांना सहभागी होता येईल.

प्रवेशिका इथे पाठवाव्यात

या अभिनव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फक्त एकच गोष्ट करायची. इच्छुक स्पर्धकांनी ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत  mpcbgreensociety@gmail.com वर प्रवेशिका इमेल कराव्यात अथवा लोकसत्ता ब्रॅण्ड विभाग, मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१ या पत्त्यावर पाठवाव्यात.  http://mpcb.gov.in या संकेतस्थळावर ग्रीन सोसायटी अभिनव संकल्प स्पर्धा २०१८ या विंडोवर क्लिक करून फॉर्म डाऊनलोड करता येईल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Green society innovative resolution competition
Show comments