आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी हरित लवादाने मंजुरी दिली आहे. यामुळे 2700 झाडांवर कुऱ्हाड येणार आहे. आरे वसाहतीत कारशेड उभारण्यास काही शिवसेना, मनसेसहित काही राजकीय पक्षांनी तसंच पर्यावरणप्रेमींनी विरोध केला होता. यावरुन आरोप प्रत्यारोपही झाले होते. मात्र हरित लवादाने हिरवा कंदील दिल्याने मेट्रो कारशेड उभं करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा ३३.५ किलोमीटर लांबीचा आणि सुमारे २३ हजार कोटी रूपये खर्चाचा मेट्रो रेल्वे प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकार यांच्या भागीदारीतून स्थापन झालेल्या ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’मार्फत राबविला जात आहे. या मेट्रोची कारशेड आरे वसाहतीत उभारण्याचा निर्णय झाला होता. मात्र, त्यासाठी अडीच हजार झाडे तोडण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काही पर्यावरणवाद्यांनी त्या निर्णयाला विरोध केला होता. त्यानंतर शिवसेना आणि मनसेनेही त्यांना पाठबळ दिल्याने पर्यायी जागेचा शोध घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञांची समिती नेमली होती.

या कार डेपोसाठी एमएमआरसीला आरेतील ३० हेक्टर जागा देण्यात आली आहे. यापैकी २२ हेक्टर जागेत कार डेपो उभारण्यात येणार आहे. या कामासाठी आरेतील या जागेवरील सुमारे ३१३० झाडे कापावी लागणार होती. उर्वरित जागेतील पाच हेक्टररील हिरवळ तशीच ठेवण्यात येणार असून, यामुळे १०७३ झाडे वाचणार आहेत. एमएमआरसीने कार डेपो, मेट्रो स्टेशन, वर्कशॉप इमारती आणि मरोळ -मरोशी रस्त्यावरील भुयारी मार्ग तसेच संबंधित कामांसाठी जानेवारी २०१७ मध्ये निविदा मागविल्या होत्या. या कामाची अंदाजित किंमत ३२८ कोटी रुपये इतकी असल्याचं सांगण्यात आलं होतं. हे काम करण्यासाठी एमएमआरसीएने मे. सॅम (इंडिया) बिल्टवेल या कंपनीची नेमणूक केली आहे. या कंपनीने यापूर्वी दिल्ली आणि लखनऊ मेट्रोचे काम केले आहे.

कार डेपो कसा असेल?
या कार डेपोमध्ये मेट्रोच्या आठ डब्यांच्या ३२ गाडय़ांची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच याच कार डेपोमध्ये या गाडय़ांची नियमित देखभाल व दुरुस्ती केली जाणार आहे. हा कार डेपो पाण्याची तसेच विजेची बचत करणारा असणार आहे. यात पर्जन्यजल साठवणूक प्रणाली बसविण्यात येणार आहे. याचबरोबर सांडपाणी प्रक्रिया केंद्रही असणार आहे. या ठिकाणी इमारती व शेड्स असणार आहे. येथील इमारतींमधून वाहतुकीचे नियंत्रण केले जाणार आहे. यामुळे तेथे सुसज्ज अशी यंत्रणा असणार आहे. तसेच प्रशासकीय इमारती आणि प्रशिक्षण केंद्रही या डेपोमध्ये असणार आहे. हे सर्व उभारण्याचे काम बिल्टवेल ही कंपनी करणार आहे.