मुंबई : विधिमंडळात प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने १० हजार रुपये घेऊन प्रवेश पास दिले जातात. तसेच लक्षेवधी लावण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पैसे देण्याची तयारी दर्शविल्याचा गौप्यस्फोट शिवसेना (ठाकरे गट) गटनेते भास्कर जाधव यांनी बुधवारी विधानसभेत केला. जाधव यांच्या या आरोपांमुळे कोंडीत सापडलेल्या अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप सदस्य धावले.

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी भास्कर जाधव यांची नियुक्ती करावी, असे पत्र महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्षांना पाठविले आहे. जाधव यांच्या नियुक्तीबाबत विरोधकांनी अध्यक्षांना वारंवार विनंती केली. मात्र त्यानंतरही जाधव यांच्या नियुक्तीची घोषणा होऊ शकली नाही. त्यामुळे नाराज विरोधकांनी आज थेट अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत त्यांच्या कार्यालयावरच भ्रष्टाचाराचे आरोप केले. विधानभवनात प्रवेशावर निर्बंध असले तरी येथे गर्दीचा बाजार मांडला आहे. एका वृत्तपत्राचा हवाला देत १० हजारांत विधानभवनाच्या प्रवेशिका मिळत असल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला.

सत्ताधारी पक्षाचे आमदार अध्यक्षांच्या दालनात जाऊन लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजेत, पैसे देतो माझी लक्षवेधी लावा, अशी विनंती करीत असल्याचा दावा जाधव यांनी केला. यातून सभागृहाची गौरवशाली परंपरा मोडीत निघाल्याचा आरोप जाधव यांनी केला. एवढेच नव्हे तर मागील सरकाच्या काळात नरहरी झिरवाळ उपाध्यक्ष असतानाही अध्यक्षांकडून कळत नकळत झिरवाळ यांना डावलून तालिका अध्यक्षांना प्राधान्य दिल्याचे सांगत जाधव यांनी अध्यक्ष नार्वेकर यांच्या कारभारावर उघड नाराजी व्यक्त केली.

‘दालनात भेटा, सभागृहात चर्चा अयोग्य’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भास्कर जाधव यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत अध्यक्षांवर हेत्वारोप करणे योग्य नसल्याचे सांगितले. तसेच जाधव यांनी केलेल्या आरोपांची दखल घेऊन कोणी कर्मचारी असे वागत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. सभागृहातील कामकाजाबाबत काही आक्षेप असल्यास अध्यक्षांना दालनात भेटून सांगा. सभागृहात त्याची चर्चा योग्य नाही असेही पवार यांनी भास्कर जाधवांना सुनावले.

‘जाधवांनी जबाबदारीने वागावे’

जाधव यांनी केलेल्या आरोपांची आपण दखल घेतली आहे. पण जाधव यांच्यासारख्या ज्येष्ठ सदस्याने सभागृहातील कामकाजाबाबत काही आक्षेप असल्यास दालनात भेटून सांगायला हवे होतो. त्यांच्या कामाची दखल घेऊन पक्षाने विरोधी पक्षनेते पदासाठी त्यांचे नाव आपल्याला सूचविले आहे. त्यामुळे जाधव यांनी जबाबदारीने वागायला हवे अशी अपेक्षा व्यक्त करीत अध्यक्षांनी या वादावर पडदा टाकला.

प्रश्न, लक्षवेधीसाठी पैशांचा यापूर्वीही आरोप

विधानसभेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले जातात, असा गंभीर आरोप काही वर्षांपूर्वी झाला होता. पत्रकार प्रकाश गुप्ते यांनी हे प्रकरण उघडकीस आणले होते. ‘लोकसत्ता’चे तत्कालीन संपादक माधव गडकरी यांनीही विधिमंडळात कसा गैरप्रकार चालतो, यावर प्रकाश टाकला होता. त्या वेळी तर भाजपच्याच काही आमदारांनी थेट अध्यक्षांच्या दालनात अशी ओरड केली.