शब-ए-मीराज म्हणजेच ‘बडी रात’ साजरी करून पहिल्या गाडीने पश्चिम उपनगरांतील आपापल्या घरांकडे परतणाऱ्या तरुणांच्या टोळक्याने मंगळवारी पहाटे कांदिवली स्थानकात पश्चिम रेल्वेच्या एका गार्डला मारहाण केली. चर्चगेटहून सुटलेल्या गाडीत चढलेल्या या तरुणांनी डब्यातील सहप्रवाशांनाही पट्टय़ाने, बांबूने मारहाण केली. त्याबाबत गार्डने नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यावर गोरेगाव स्थानकात गाडी थांबली असता यापैकी काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र काही तरुण लपून राहिले आणि त्यंनी कांदिवली स्थानकात गार्डवर हल्ला चढवला. या गार्डने बावचळून लोकल थांबवली आणि त्याचा फायदा घेत या टोळक्याने पळ काढला.
सोमवारची रात्र शब-ए-मीराज म्हणजेच ‘बडी रात’ होती. ही रात्र साजरी करण्यासाठी पश्चिम उपनगरांतून दक्षिण मुंबईत आलेली तरुणांची टोळकी मंगळवारी पहाटे पहिल्या गाडीने घराकडे परतत होती. त्या वेळी त्यांनी सहप्रवाशांना मारायला सुरुवात केली. त्यामुळे गार्ड राकेश संकेत यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर गोरेगाव स्थानकात आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांनी या टोळक्यातील काहींना अटक केली. गाडीने सकाळी ५.२५च्या सुमारास कांदिवली गाठल्यानंतर या तरुणांनी राकेश यांनाही मारहाण केली़
राकेश यांच्या उजव्या हाताला जबर मार बसला असून त्यांना पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

Story img Loader