मधु कांबळे
मुंबई : राज्यातील मोठय़ा विद्यापीठांवरील शैक्षणिक व प्रशासकीय भार कमी करण्याच्या दृष्टीने २ ते ५ महाविद्यालये एकत्र करुन लहान-लहान समुह विद्यापीठे (क्लस्टर युनिव्हर्सिटी) तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत मार्गदर्शक सूचनांचा मसुदा सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला. साधारणत: एका समुह विद्यापीठात किमान ४ हजार विद्यार्थी असावेत, असा निकष ठरविण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार (२०२०) व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार उच्च शिक्षण संस्थांचे बहुविद्याशाखीय संस्थांमध्ये रुपांतर करण्यासाठी समुह विद्यापीठांची निर्मीती केली जाणार आहे. राज्यात सध्या डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ, एचएसएनसी विद्यापीठ मुंबई व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा अशी तीन समुह विद्यापीठे आहेत. अध्यापन व शिक्षण प्रक्रियेतील नवसंकल्पनांना चालना देऊन आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम विकसित करण्यासाठी लहान समुह विद्यापीठांची ही संकल्पना पुढे आली. एकाच व्यवस्थापनाखाली उच्च शिक्षण संस्था एकत्र आणून एक समुह विद्यापीठ तयार केले जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जारी केलेल्या मसुदा मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. समुह विद्यापीठांचे प्रमुख हे कुलुगरु असतील.
समूह विद्यापीठासाठी अटी
समूह विद्यापीठांना राज्य सरकारच्या आरक्षण धोरणाचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल. सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांना प्राधान्य देऊन वसतिगृहांची व्यवस्था करावी तसेच विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या निवासासाठी स्वतंत्र योग्य व्यवस्था असावी असे या मार्गदर्शक तत्त्वांत नमूद करण्यात आले आहे. गरजु विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि आवश्यकतेनुसार आर्थिक मदत देण्याचे वचन दिले पाहिजे, अशी सूचनाही सरकारने केली आहे. महाराष्ट्रात समुह विद्यापीठे स्थापन करण्यासाठी जारी करण्यात आलेल्या मसुदा मार्गदर्शक सूचनांवर ३० जूनपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर समुह विद्यापीठ धोरणाला अंतिम रुप दिले जाईल.
निकष काय?
एकच व्यवस्थापन किंवा संस्थेच्या अधिपत्याखालील २ ते ५ महाविद्यालयांचा समावेश
संसाधने, शैक्षणिक, भौतिक व तांत्रिक सुविधांचे एकत्रीकरण
पाचपेक्षा अधिक महाविद्यालये असल्यास शासनाला प्रकरणनिहाय निर्णयाचा अधिकार
प्रमुख महाविद्यालय किमान
२० वर्षांपासून अस्तित्वात असावे
सहभागी महाविद्यालयांतील विद्यार्थी संख्या किमान २ हजार
समूह विद्यापीठातील एकूण विद्यार्थी संख्या किमान ४ हजार
किमान १५ हजार चौ.मी. एकत्रित बांधकाम क्षेत्र
एमएमआरमध्ये २ हेक्टर जागा
नागपूर, औरंगाबाद, पुणे व नाशिकमध्ये ४ हेक्टर जागा
उर्वरित भागांत ६ हेक्टर जागा