लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महापालिकेची रुग्णालये बाहेरील संस्थांना चालवण्यास देऊन त्याचे खासगीकरण करण्यास विरोध वाढू लागला आहे. शिवसेना (ठाकरे) आणि कामगार सेनेपाठोपाठ आता या धोरणाला भाजपचे माजी नगरसेवक, तसेच म्युनिसिपल मजदूर युनियननेही विरोध केला आहे. कोणत्याही रुग्णालयाचे खाजगीकरण होऊ देणार नाही. असा इशारा युनियनने दिला आहे.
परवडणाऱ्या दरात आरोग्य सुविधा देण्यासाठी येत्या काळात सार्वजनिक खाजगी भागीदारी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) धोरण अवलंबण्याचे मुंबई महापालिकेने ठरवले आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबत आगामी अर्थसंकल्पात घोषणा केली आहे. या धोरणाला पालिका वर्तुळातून विरोध वाढू लागला आहे. हे धोरण म्हणजे रुग्णालयांचे खासगीकरण असून यामुळे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपचार मिळणार नाहीत, असा सूर उमटू लागला आहे.
मुंबई महापालिकेने गेल्या काही दिवसात मानखुर्दच्या नवीन रुग्णालयासाठी व बोरिबवलीच्या भगवती रुग्णालयाच्या देखभालीसाठी संस्था नेमण्याकरीता निविदा मागवल्या होत्या. भगवती रुग्णालयाचे खासगीकरण करण्यास शिवसेनेचे (ठाकरे) उपनेते विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून विरोध केला. तर दुसरीकडे मुलुंडमध्ये भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनीही एम. टी. अगरवाल रुग्णालयाचे खासगीकरण करण्यास विरोध दर्शवला आहे. गंगाधरे यांनी या संदर्भात नुकतेच पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून आपला विरोध व्यक्त केला आहे.
गंगाधरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, मुलुंड पश्चिम येथील एम. टी. अगरवाल रुग्णालय पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून रुग्णालय इमारत लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. या रुग्णालयाचे खाजगीकरण करण्यात येणार असल्याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. महापालिकेने एवढा निधी खर्च करून रुग्णालयाची पुनर्बांधणी केली व आता जेव्हा रुग्णालय सुरू करण्याची वेळ आली तेव्हा ते खाजगी संस्थेला चालवायला देणे हे अयोग्य आहे. या रुग्णालयाची पुनर्बांधणी करण्यापूर्वी रुग्णालयातील आय.सी.यु. युनिट जेव्हा खाजगी संस्थेला चालवायला दिले होते. तेव्हा त्यातील सावळा गोंधळ महापालिका प्रशासनाने पाहिला होता. त्यावेळी डॉक्टर उपलब्ध नसायचे, कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही नियमांचे पालन होत नव्हते, मनमर्जी कारभार व्हायचा.
गेल्या काही वर्षांपासून या रुग्णालयात विविध समस्यांना रुग्णांना सामोरे जावे लागले होते. दोन वर्षांपूर्वी अतिदक्षता विभागात डॉक्टर उपलब्ध नसल्याने काही रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे रुग्णालयाचे खासगीकरण झाल्यास तेथे उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे, असे मत गंगाधरे यांनी व्यक्त केले.
खाजगीकरण होऊ देणार नाही
म्युनिसिपल मजदूर युनियननेही रुग्णालयांच्या खासगीकरणाला विरोध केला आहे. जनतेच्या पैशातून रुग्णालये बांधून पूर्ण झाल्यानंतर त्याचही खाजगीकरण करण्याचा डाव पालिका प्रशासनाने आखला आहे. आम्ही कोणत्याही रुग्णालयाचे खाजगीकरण होऊ देणार नाही. असा इशारा देत म्युनिसिपल मजदूर युनियनच्यावतीने मागणी सप्ताह सुरू केला असून वेळप्रसंगी रुग्णालये वाचविण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, सरचिटणीस वामन काविस्कर, तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळेल
रुग्णालये खाजगी संस्थांना देऊन लोकांचे उपचार महाग केले जात आहेत. तसेच पालिका कामगारावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे, असे मत अशोक जाधव यांनी व्यक्त केले. गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेच्या सभागृहामध्ये निवडून गेलेले लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक, महापौर आणि विरोधी पक्षनेता नसल्यामुळे सरकारला मोकळे रान मिळाले आहे. सरकारच्या इशाऱ्यावर मुंबई महापालिका प्रशासन कारभार हाकत आहेत, असाही आरोप संघटनेने केला आहे.