मुंबई : जी.टी. रुग्णालयाचे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रुपांतर झाल्यानंतर वैद्यकीय सेवांमध्ये हळूहळू वाढ करण्यात येत आहे. मात्र वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आवश्यक असणारे डॉक्टर उपलब्ध करण्यात समस्या निर्माण होत होत्या. मात्र जिल्हा निवासी कार्यक्रमांतर्गत जी. टी. रुग्णालयाला ७० निवासी डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णसेवेला हातभार लागण्यास मदत होणार आहे.

दक्षिण मुंबईतील जी. टी. रुग्णालयाला जुलै २०२४ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणून मान्यता मिळाली. त्यामुळे जी. टी. रुग्णालयामध्ये टप्प्याटप्याने अद्ययावत व आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू झाली. जी. टी. रुग्णालयामध्ये नवीन सीटी स्कॅन विभाग सुरू करण्यात असून शस्त्रकियागृहाचे अद्ययावतीकरण करण्यात आले. सहा नवीन शस्त्रक्रियागृह उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर २३ अनुभवी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे इंडोस्कोपी, लॅप्रोस्कोपी, यकृत, पाठीचे मणके, कान – नाक – घसा, नेत्रविभागातील यंत्रसामग्री अद्ययावत करण्यात येत आहे. मात्र त्याच वेळी पुरेसे डॉक्टर नसल्याने रुग्णसेवा पुरविण्यात रुग्णालय प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागत होतो. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगामार्फत राबविण्यात येणाऱ्या जिल्हा निवासी कार्यक्रमामुळे जी. टी. रुग्णालयाला अपुऱ्या डॉक्टरांना भेडसावणारी समस्या दूर झाली आहे. आयोगाकडून राबविण्यात येणाऱ्या जिल्हा निवासी कार्यक्रमाअंतर्गत पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या डॉक्टरांना तीन महिन्यांसाठी अन्य जिल्हास्तरीय रुग्णालयांमध्ये शिकवण्यासाठी पाठविण्यात येते. जेणेकरून विद्यार्थ्यांना शिक्षणाची अधिक संधी उपलब्ध होईल. तसेच जिल्हास्तरीय रुग्णालयातील रुग्णसेवेला हातभार लागण्यास मदत होते. या जिल्हा निवासी कार्यक्रमांतर्गत जे. जे. रुग्णालयातील ७० निवासी डॉक्टर जी. टी. रुग्णालयाला उपलब्ध होणार आहेत. हे डॉक्टर टप्प्याटप्याने उपलब्ध होणार आहेत. त्यानुसार शस्त्रक्रिया विभागासाठी ८, वैद्यकीय विभागासाठी ६, स्त्रीरोग विभागासाठी ६, बालरोग विभागासाठी ४ डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. यामुळे जी. टी. रुग्णालयामध्ये सध्या कार्यरत डॉक्टरांना मदत होणार आहे. तसेच रुग्णालयामध्ये वैद्यकीय सेवा पुरविण्यास अतिरिक्त डॉक्टर उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जी.टी. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जीतेंद्र संकपाळ यांनी दिली.

अन्य रुग्णालयात निवासी डॉक्टरांसाठी निवास व्यवस्था नसल्याने जिल्हा निवासी कार्यक्रमाअंतर्गत रुग्णसेवेसाठी जाणाऱ्या जे. जे. रुग्णालयातील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना सायंकाळी पुन्हा जे. जे. रुग्णालयात यावे लागत होते. मात्र जी. टी. रुग्णालयामध्ये निवासाची व्यवस्था असल्याने त्यांचा प्रवासाचा त्रास कमी होईल. तसेच त्यांना रुग्णसेवेबरोबरच त्यांच्या अभ्यासावरही लक्ष केंद्रीत करता येईल, असे डाॅ. जीतेंद्र संकपाळ यांनी सांगितले.

Story img Loader