चर्चगेटहून बोरिवलीला जात असलेल्या उपनगरी गाडीच्या गार्डला मंगळवारी पहाटे विलेपार्ले आणि गोरेगाव स्थानकामध्ये अज्ञात टोळक्याने मारहाण केली. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मारहाणीचे निश्चित कारण समजले नसले तरी मोटरमन आणि गार्ड यांना मारहाण होण्याचे प्रकार वाढत असून मारहाणीच्या घटना अशाच घडत राहिल्या तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा पश्चिम रेल्वे गार्ड असोसिएशनने दिला आहे.
पहाटे ५.१८ वाजता बोरिवलीला जाणारी गाडी विलेपार्ले स्थानकावर थांबली असता गार्ड स्वामीनाथ पाल फलाटावर उभे होते. इतक्यात गाडीमधून प्रवास करणाऱ्या एका टोळक्याने त्यांना अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. घाबरलेल्या पाल यांनी डब्यात शिरून स्वत:ला बंद करून घेतले आणि गाडी पुढे रवाना झाली. गोरेगाव स्थानकामध्ये गाडी आली असता पुन्हा त्या टोळक्याने पाल यांना मारहाण केली आणि ते पळून गेले. पाल यांनी याबाबत वरिष्ठ विभागीय वाहतूक व्यवस्थापक रजनीश अगरवाल यांच्याकडे तक्रार केली आहे. पाल यांना मारहाण करणारे टोळके हे सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाऊन परत येत होते, असे पाल यांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी विलेपार्ले स्थानकामध्ये एका मोटरमनला प्रवाशांनी मारहाण केली होती.

Story img Loader