रेल्वेच्या नियमावलीनुसार उपनगरीय रेल्वेपासून मालगाडीपर्यंत सर्व गाडय़ांचे नियंत्रण ज्याच्या हाती असते, असे गार्डचे पद रेल्वेतून हद्दपार होण्याची शक्यता आहे. उपनगरीय रेल्वे गाडय़ांमधील गार्डचे पद हटवून त्या जागी मोटरमनलाच नेमावे, अशी शिफारस रेल्वे मंडळाच्या उच्चस्तरीय समितीने केली आहे. असे झाल्यास हातात हिरवा किंवा लाल बावटा घेऊन दिमाखात गाडीच्या शेवटच्या डब्यात बसणारा गार्ड यापुढे दिसणार नाही. मात्र रेल्वे कामगार संघटनांनी या शिफारशीला आक्षेप घेतला असून रेल्वेच्या नियमावलीचे उल्लंघन या समितीला करता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
गार्डचे काम काय?
उपनगरीय रेल्वेच्या गाडय़ांमध्ये मोटरमन हे महत्त्वाचे पद असले, तरी नियमावलीप्रमाणे गाडीचा ताबा आणि नियंत्रण गार्डकडेच असते. प्लॅटफॉर्मवर थांबलेली गाडी सोडायची, प्रवासी गाडीत चढले का, आदींबाबत गार्डच मोटरमनला सूचना देत असतो. त्याशिवाय वेगमर्यादा असलेल्या ठिकाणाहून गाडी जाताना त्या क्षेत्रातून गाडी पूर्णपणे पुढे गेली का, याची माहितीही गार्डच मोटरमनला देतो. त्यामुळे ब्रिटिशांच्या काळापासूनच गार्डला रेल्वेच्या सेवेत महत्त्व देण्यात आले आहे.
उपनगरीय रेल्वे क्षेत्रात गाडी शेवटच्या स्थानकात आल्यानंतर गार्ड आणि मोटरमन यांच्या जागा बदलतात. अनेकदा दुसरा मोटरमन आणि गार्ड आधीच येऊन त्या जागी थांबलेले असतात. पण या जागा बदलण्यासाठी खूप वेळ लागतो. परिणामी शेवटच्या स्थानकात आलेली गाडी लगेच पुढील प्रवासासाठी निघत नाही. त्यामुळे गार्डऐवजी मोटरमनलाच गार्डच्या कर्तव्यांचे धडे देऊन गार्डचे पद रेल्वेतून काढून टाकावे, अशी शिफारस रेल्वे मंडळाच्या उच्चस्तरीय समितीने केली आहे.
पाठिंबा व विरोध
गार्डची सगळीच कामे मोटरमन पार पाडू शकतात. त्याशिवाय गाडीत दोन्ही बाजूंना मोटरमनच असेल, तर शेवटच्या स्थानकात लागणारा वेळही टळू शकेल आणि त्यामुळे उपनगरीय फेऱ्यांमध्येही वाढ करणे शक्य होईल. त्यामुळे गार्डची गरज नसल्याचे या समितीतील एका सदस्याने सांगितले. मात्र गार्ड हा उपनगरीय लोकलचे नियंत्रण करतो. त्यामुळे गार्डचे पद रद्द करण्याची शिफारस चुकीची आहे. हे पद रद्द केल्यावर मुंबई विभागातील मध्य रेल्वेच्या अखत्यारीतील ६५०च्या आसपास आणि पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीतील सुमारे ४०० गार्ड यांचे काय करायचे, हा प्रश्न आहे. या गार्डना मोटरमनचे प्रशिक्षण देऊन सेवेत ठेवण्याची रेल्वेची तयारी असेल, तरच ही शिफारस मंजूर करावी, असे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू नायर यांनी स्पष्ट केले.

Story img Loader