मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे पालिका मुख्यालयात दालन सुरू केल्यानंतर आता शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांचेही दालन पालिका मुख्यालयात सुरू करण्यात येणार आहे. केसरकर हे आठवडय़ाच्या प्रत्येक बुधवारी मुंबई महापालिका मुख्यालयात नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहेत. दरम्यान, केसरकर यांना दालन दिल्यामुळे आता शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांनाही पालिका मुख्यालयात हक्काचे कार्यालय मिळणार असल्याची चर्चा आहे.
उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना २१ जुलै रोजी पालिका मुख्यालयात पहिल्या मजल्यावर दालन देण्यात आले. यावरून राजकीय वर्तुळातून विशेषत: ठाकरे गटाने मोठा विरोध केला होता. हे दालन लोढा यांना देऊ नये, अशी मागणीही आमदार आदित्य ठाकरे यांनी केली होती. मात्र पालकमंत्र्यांच्या मागणीमुळे हे दालन देण्यात आले असल्याचे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी या वादावर आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले. तसेच शहर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी मागणी केल्यास त्यांनाही दालन दिले जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यानंतर आता दोन महिन्यांनी शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना पहिल्या मजल्यावर लोढा यांच्या दालनाशेजारचे दालन देण्यात आले आहे. केसरकर हे मुंबईकर नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पालिका मुख्यालयात आठवडय़ाच्या प्रत्येक बुधवारी दुपारी १ ते ४ या वेळेत उपलब्ध राहणार आहेत, असे पालिका प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक काढून कळवले आहे. आज बुधवार, ४ ऑक्टोबर रोजी हे कार्यालय सुरू होणार आहे. मुंबई शहरातील सर्व नागरिकांनी शासकीय योजना, विकासकामे याबाबतच्या सूचना तसेच इतर समस्या असल्यास त्याबाबतच्या निवेदन अथवा लेखी अर्जासह उपस्थित राहावे. नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विषयांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच इतर विषयांसाठी पालिका मुख्यालयात उपस्थित राहता येईल, असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी केले आहे. बुधवारी मंत्रिमंडळ बैठक असल्यास पालकमंत्री गुरुवारी उपलब्ध राहतील, असेही त्यांनी कळवले आहे.
हेही वाचा >>>अजित पवार यांच्या अनुपस्थितीचीच चर्चा ; मुख्यमंत्री शिंदे , फडणवीस दिल्लीत
पालकमंत्री लोढा यांना दालन तसेच पालिकेचे दोन कर्मचारी देण्यात आले आहेत. त्याचबरोबर समन्वयासाठी एका पालिका अधिकाऱ्याची नेमणूकही करण्यात आली आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या साहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांच्यावर ही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. लोढा यांना दालन दिल्यानंतर त्यावर मोठय़ा प्रमाणावर टीका विरोधी पक्षाकडून झाली होती.