मुंबई: उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बुधवारी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात येऊन कामकाजाला सुरूवात केली. केसरकर यांना बुधवारी दालन देण्यात येणार होते. मात्र कोणते दालन द्यायचे हे नक्की न झाल्यामुळे त्यांचे कार्यालय सुरू होऊ शकले नाही. मात्र स्थायी समिती सभागृहात त्यांनी जनता दरबार घेऊन नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील माजी नगरसेवक उपस्थित होते.उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यापाठोपाठ आता शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासाठी बुधवारी महानगरपालिका मुख्यालयात दालन सुरू करण्यात येणार होते. मात्र पहिल्या मजल्यावरील कोणते दालन द्यायचे याबाबत निर्णय न झाल्यामुळे त्यांचे कार्यालय सुरू होऊ शकले नाही. जे दालन केसरकर यांना दिले होते ते लहान असल्यामुळे सभागृह नेत्यांचे दालन देण्याबाबत विचार होता. मात्र त्याबाबत निर्णय न झाल्यामुळे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आलेल्या नागरिकांच्या तक्रारी स्थायी समिती सभागृहात बसून ऐकून घेतल्या. यानिमित्ताने पालिका मुख्यालयात जुन्या इमारतीत कित्येक दिवसांनंतर नागरिकांची वर्दळ पाहायला मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी नागरिकांनी आपापल्या विभागातील विविध समस्या माडल्या. जलतरण तलावाचे शुल्क वाढवल्याबाबत काही नागरिकांनी तक्रारी केली. तर वडाळा स्थानकातील स्कायवॉकवर अतिक्रमण, शिवडी किल्ल्याच्या बाजूला अनधिकृत बांधकाम आदींविषयी नागरिकांनी तक्रारी केल्या. यावेळी शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव, वडाळा येथील माजी नगरसेवक अमेय घोले, विभागप्रमुख दिलीप नाईक उपस्थित होते.

हेही वाचा >>>एसआरए प्राधिकरणाची जबाबदारी महानगरपालिकेच्या खांद्यावर; मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे एसआरए वसाहतीमधील प्रसाधनगृहांची दुरुस्ती महानगरपालिका करणार

केसरकर हे आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहे. दरम्यान, केसरकर यांना दालन दिल्यामुळे आता शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांनाही महानगरपालिका मुख्यालयात हक्काचे कार्यालय मिळणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, केसरकर यांना दालन देण्याच्या निर्णयाचा मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी निषेध केला आहे. नियम, कायदे, प्रथा, परंपरा मोडून जनतेचा विरोध पायदळी तुडवून सत्ताधिकाऱ्यांनी मुंबई महापालिकेवर कब्जा मिळवला आहे, अशी टीका त्यांनी समाजमाध्यमांवर केली आहे. त्यांना लोकांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही, यांचा केवळ महापालिकेच्या तिजोरीवर डोळा आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guardian minister deepak kesarkar is still waiting for a hall in the mumbai municipal corporation headquarters mumbai print news amy
Show comments