मुंबई :  तब्बल दोन वर्षांनी संपूर्ण मुंबईत गुढीपाडव्याचा सण जल्लोषात साजरा करण्यात आला. मुंबईतील गिरगाव, दादर, विलेपार्ले, परळ आदी मराठमोळय़ा विभागांमध्ये भव्य शोभायात्रा काढत, वाजत गाजत नववर्षांचे स्वागत करण्यात आले. करोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यामुळे राज्य सरकारने टाळेबंदीचे सर्व निर्बंध मागे घेतल्यानंतरचा हा पहिलाच सण वाजत गाजत साजरा केला.

 गेल्या दोन वर्षांपासून जगभरात करोनाचा संसर्ग असल्यामुळे सगळय़ाच सणांवर आणि दैनंदिन जीवनावरही अनेक निर्बंध आले होते. टाळेबंदीचे निर्बंध हळूहळू शिथिल झाले तरी १ एप्रिलपासून उर्वरित सर्व निर्बंध हटवण्यात आले व मुखपट्टीची सक्तीही काढून टाकण्यात आली. त्यामुळे मोकळय़ा वातावरणात यंदा गुढीपाडव्याचा सण नागरिकांनी रस्त्यावर उतरून साजरा केला. करोनापूर्व काळाप्रमाणेच नागिरकांनी शोभायात्रांमध्ये पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. गिरगाव, दादर, परळ, विलेपार्ले अशा मराठी बहुल वस्त्यांमध्ये शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक ठिकाणी उंच गुढय़ा उभारून नववर्षांचा सण साजरा केला.

विविध राजकीय पक्षांनीही गुढीपाडव्याच्या कार्यक्रमात सहभागी होत प्रचाराची संधी साधली. गिरगावात शिवसेनेतर्फे आरोग्यगुढी उभारण्यात आली होती. महाराष्ट्राचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा दाखवणारे चित्ररथ शोभायात्रेत आणले होते. जवळपास एकूण १५ चित्ररथ शोभायात्रेत होते.

Story img Loader