Gudi Padwa 2019 : गुढी पाडवा आणि मराठी नववर्षाचा राज्यभरात मोठा उत्साह पहायला मिळत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या गुढी पाडव्याच्या मंगलदिनी मुंबईसह राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्ये पारंपारिक शोभायात्रांचे आयोजनही करण्यात आले आहे. यामध्ये पारंपारिक मराठी पोषाखात तरुणाई सहभागी झाली आहे. रस्त्यांवर मोठ्या रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. पारंपारिक वाद्ये ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर सोशल मीडियातून गुढी पाडव्याच्या शुभेच्छांचे संदेश फॉरवर्ड होत आहेत.

मुंबईत या मराठी नववर्षानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये दादर, गिरगाव, ठाणे आणि डोंबिवली या भागात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. नऊवारी साडी, नाकात नथ, डोक्यावर फगवा फेटा अशा पेहरावात गिरगावात दरवर्षी महिलांची बाईक रॅली काढण्यात येते. तसेच या शहरांमधील शोभायात्रांच्या प्रमुख मार्गावर मोठ्या रांगोळ्याही काढण्यात आल्या असून यामधून सामाजिक संदेश देण्यात आला आहे. लहान मुले हातात भगव्या पताका घेऊन ध्वजपथकात सहभागी झालेले आहेत. भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या कारवाईवर आधारित विविध चित्ररथही या शोभायांत्रांमध्ये पहायला मिळत आहेत. त्याचबरोबर सध्या देशभरात निवडणुकांचे वातावरण असल्याने अनेक शोभायात्रांमध्ये मतदारांसाठी जनजागृतीबाबतचे संदेश देणारे देखावे साकारण्यात आले आहेत.

पंतप्रधानांच्या मराठीतून शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मराठी जनतेला गुढी पाडव्याच्या आणि मराठी नव वर्षाच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘महाराष्ट्र आणि जगभरातील मराठी बांधवांना हे नवे वर्ष आनंदाचे, उत्तम आरोग्याचे, भरभराटीचे आणि समृद्धीचे जावो,’ अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत.

विविध सेलिब्रेटिंनीही गुढी पाडव्यानिमित्त आपल्या चाहत्यांना आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून गुडी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आपल्या प्राचीन कॅलेंडरनुसार चैत्र शुक्ल महिन्याला सुरुवात होत असून हिंदू नववर्षाच्या सर्वांना सदिच्छा असे त्यांनी म्हटले आहे.’

त्याचबरोबर चैत्र नवरात्रीलाही आजपासून सुरुवात होत असल्याने देशभरातील मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. मुंबईची ग्रामदेवता मुम्बा देवीच्या मंदिरातही यानिमित्त पहाटे आरती करण्यात आल्या यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.