दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात करिअरच्या संधींचा भविष्यवेध

मुंबई : कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी, वैद्यकीय यांसह इतर उच्च शिक्षणाच्या संधी कोणत्या? शैक्षणिक प्रवासातील विशिष्ट टप्प्यांनंतर पुढे काय करायचे, नवनवीन अभ्यासक्रम व सदर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया कशी आहे, याबाबत ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. सध्याच्या स्पर्धात्मक जगात कौशल्य विकास क्षेत्र कशाप्रकारे महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे, विविध उद्योगांना कोणकोणत्या कौशल्यांची आवश्यकता भासत आहे, या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम आणि रोजगाराच्या संधी कोणत्या? याबाबतही जाणून घेता येणार आहे. तसेच परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधींची ओळख आणि प्रवेशप्रक्रियेसंबंधित विविध प्रश्नांची उत्तरेही ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत मिळणार आहेत. माटुंगा पश्चिमेकडील दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात येत्या २५ व २६ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत ही कार्यशाळा होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत कौशल्य विकास क्षेत्राबाबत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर मार्गदर्शन करणार आहेत. दहावी, बारावी, पदवी आणि पदविका अभ्यासक्रमांनंतर कौशल्य विकास क्षेत्रासंबंधित कोणकोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. पारंपारिक विद्याशाखांची पदवी प्राप्त करूनही कौशल्य विकास अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल का? प्रवेशप्रक्रिया कशी असेल? रोजगाराच्या संधी कोणत्या? कोणकोणत्या क्षेत्रांत कशा पद्धतींच्या कौशल्यांची आवश्यकता आहे आणि त्या कौशल्यांशी निगडित अभ्यासक्रम कोणते? आदी विविध गोष्टींबाबत डॉ. अपूर्वा पालकर संवाद साधणार आहेत. तर परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधींचा मागोवा बख्तावर कृष्णन घेणार आहेत. परदेशातील विविध उच्च शिक्षणाच्या संधी, परीक्षा, शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया, विद्यापीठाची निवड कशी करावी आदी गोष्टींबाबत बख्तावर कृष्णन मार्गदर्शन करतील.

दहावी व बारावी परीक्षेच्या निकालानंतर गोंधळलेल्या मनःस्थितीतून बाहेर कसे पडावे आणि विद्यार्थी व पालकांचे नाते कसे असावे, याबाबत डॉ. हरीश शेट्टी (२५ मे) व डॉ. राजेंद्र बर्वे (२६ मे) संवाद साधतील. नव्या वाटा या सत्राअंतर्गत युट्यूब – समाजमाध्यमे या विषयावर सुकीर्त गुमास्ते, वित्तक्षेत्रातील संधींबाबत कौस्तुभ जोशी आणि एआय – कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत डॉ. भूषण केळकर विश्लेषण करणार आहेत. नवनवीन अभ्यासक्रम व विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींचा मागोवा विवेक वेलणकर घेणार आहेत.

विद्यार्थ्यांसाठी करिअर निवडीची दिशा सुस्पष्ट करणाऱ्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत दोन्ही दिवस सारख्याच विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. यामुळे विद्यार्थी व पालक त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही एका दिवसाची निवड करू शकतात. सदर कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून प्रवेश शुल्क अवघे ५० रुपये असेल.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शंकानिरसनाची संधी

कधी ? शनिवार, २५ मे आणि रविवार, २६ मे रोजी

कुठे ? दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, यशवंत नाट्य मंदिराच्या मागे, माटुंगा (पश्चिम)

केव्हा ? सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत

ऑनलाइन पद्धतीने प्रवेशिका आरक्षित करण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या

२५ मे : http://tiny.cc/LS_MargYashacha_25May

२६ मे : http://tiny.cc/LS_MargYashacha_26May

प्रत्यक्ष पद्धतीने प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेच्या प्रवेशिका ऑनलाइनसह प्रत्यक्ष पद्धतीनेही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दादर पश्चिमेकडील छबिलदास मार्गावरील ७ अब्बास मॅन्शन, फॅमिली स्टोअर येथे सकाळी ९.३० ते १.३० आणि दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत प्रवेशिका उपलब्ध असतील.

मुख्य प्रायोजक – आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड

सहप्रायोजक – सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी, द सिव्हीलियन अकॅडमी,

संकल्प आय ए एस फोरम, डी वाय पाटील युनिव्हर्सिटी, सिंहगड इन्स्टिट्यूट्स

बँकिंग पार्टनर – युनियन बँक ऑफ इंडिया पॉवर्ड बाय – ज्ञानदीप अकॅडमी फॉर यू.पी.एस.सी. अँड एम.पी.एस.सी., पुणे, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, एस आर एम युनिव्हर्सिटी, एपी, मंथन आर्ट स्कूल, आदित्य स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guidance on higher education opportunities in abroad skill development in loksatta marg yashacha workshop mumbai print news zws