मीटरप्रमाणे भाडे न आकारता प्रवाशांची मनमानी लूट करणाऱ्या कल्याण-डोंबिवलीतील रिक्षाचालकांना आता त्यांच्या संघटनेकडूनही चपराक बसणार आहे. मीटरप्रमाणे भाडे न आकारणाऱ्या रिक्षाचालकांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ), वाहतूक विभागाने कारवाई केली तर कोणतीही रिक्षा संघटना त्या रिक्षाचालकाला पाठीशी घालणार नाही. असा निर्णय शनिवारी झालेल्या रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
कल्याण, डोंबिवलीतील सर्व रिक्षांना इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसविले आहेत. मात्र, अद्याप रिक्षाचालक मनमानी पद्धतीने प्रवाशांकडून भाडे घेत आहेत. शहरातील मग्रुर रिक्षाचालकांविरोधात ‘लोकसत्ता’ने गेल्या आठवडय़ापासून मोहीम उघडली आहे. या पाश्र्वभूमीवर शनिवारी कल्याण डोंबिवलीतील रिक्षा संघटनांचे नेते, आरटीओ आणि वाहतूक पोलीस यांनी रिक्षाचालकांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र बैठकींचे आयोजन केले होते. कोकण प्रांत रिक्षा – टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पेणकर, आमदार रवींद्र चव्हाण, महाराष्ट्र रिक्षाचालक सेनेचे तात्या माने, रामा काकडे व इतर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, वाहतूक निरीक्षक रमेश चव्हाण, यादव या बैठकींमध्ये उपस्थित होते.
रिक्षाचालकांनी प्रवाशाने मागणी केल्यास कोणतेही कारण न देता मीटर डाऊन करून प्रवास सुरू करावा. शेअर रिक्षा व मीटरचे वाहनतळ एकत्र असले तरी प्रवाशांच्या मागणीप्रमाणेच चालकाने प्रवासी वाहतूक करावी. प्रवाशांशी भाडय़ावरून वाद घालणाऱ्या रिक्षाचालकावर आरटीओ, वाहतूक पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल. तसेच संघटनाही त्यांची पाठराखण करणार नाही, असा निर्णय बैठकीत झाला. मीटरप्रमाणे प्रवासी वाहतूक होण्यासाठी आरटीओ अधिकारी, पोलिसांनी एक महिनाभर वाहनतळांच्या ठिकाणी गस्त घालावी, अशी मागणी संघटनेच्या नेत्यांनीच अधिकाऱ्यांकडे केली. ‘मीटरप्रमाणे भाडे नाकारणाऱ्या चालकावर कारवाई केली तर त्याला सोडविण्यासाठी येणाऱ्याचेही ऐकले जाणार नाही,’ असे संजय डोळे यांनी स्पष्ट केले. तर डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेत ये-जा करणाऱ्या रिक्षांवर कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन वाहतूक अधिकाऱ्यांनी दिले.

Story img Loader