भिकारी म्हटले की मळकट फाटके कपडे, दयनीय अवस्था आणि शारीरिक व्यंगाचा हवाला देऊन मदतीची याचना करणारी व्यक्ती डोळ्यांसमोर उभी राहते. त्यामुळे सर्वसामान्यांचा हातही मदतीसाठी नकळत खिशाकडे वळतो. मात्र हल्ली हेच भिकारी एकत्रित येऊन ‘व्यवसाय’ चालवत असल्याचे पाहायला मिळत आहे. मकर संक्रांतीनिमित्त गुजरात, पालघर, सफाळे, केळवे रोड, तलासरी, जव्हार आदी भागांतून अनेक भिकारी मीरा रोड, दहिसर, बोरिवली, कांदिवली अशा गुजरातीबहुल भागात आले आहेत. मकर संक्रांती हा गुजराती समाजात अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी दान करण्याची प्रथा आहे. त्यामुळे पैसे, कपडे, धान्य, तीळ, तेल आदी वस्तू मोठय़ा प्रमाणात दान केल्या जातात. या वस्तू आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी अनेक भिकारी लांबचा प्रवास करून मुंबईच्या गुजरातीबहुल परिसरात मकर संक्रांतीच्या अदल्या दिवशी दाखल होतात. ही परंपरा अनेक वर्षे सुरू आहे. दिवसभर दान मिळवून झाले की संध्याकाळी हे लोक परतीच्या प्रवासासाठी निघतात. हे भिकारी दिवसभरात साधारणत: ५०० ते ८०० रुपयांची कमाई करतात, असे सामाजिक विषयाचे अभ्यासक हिरेश जोशी यांनी सांगितले. यात महिला, लहान मुलांचा मोठय़ा प्रमाणात समावेश असतो. येथे येणाऱ्या भिकाऱ्यांपैकी कोण कुठे बसून भीक मागणार हे त्यांचा म्होरक्या आधीच ठरवून ठेवतो. जमलेल्या भिकाऱ्यांची राहण्याची सोय करण्याची जाबादारीही या म्होरक्यावर असते. तसेच भिकाऱ्यांना त्यांच्या ठिकाणाहून कुणी उठविणार नाही याची काळजीही हा म्होरक्या आणि त्याचे काही सहकारी घेत असतात. या सर्वाचा मोबदला म्हणून प्रत्येक भिकाऱ्याकडून दिवसभर झालेल्या कमाईतील काही हिस्सा त्यांना दिला जातो.
शुक्रवारी बोरिवलीच्या कार्टर रोड क्रमांक तीनवर अनेक महिला भीक मागताना दिसत होत्या. गुरुवारी रात्रीपासून अनेक भिकारी या ठिकाणी आले होते. यात अनेक महिलांच्या झोळीत लहान बाळं आहेत. त्यामुळे लोक हळहळ व्यक्त करून सढळ हाताने मदत करतात. त्यात सण असल्याने लोक मदत करताना विचार करत नाहीत. पूर्वी सायंकाळपर्यंत थांबून राहणारे हे लोक यंदा आधीच कमाई झाल्याने दुपारनंतरच इथून जाऊ लागल्याचे दिसत आहेत, असे बोरिवलीचे स्थानिक भूषण कदम यांनी सांगितले.
आम्ही पालघरहून आलो आहोत. रोज पालघर रेल्वे स्टेशनवर भीक मागतो. मात्र मकर संक्रांतीला जास्त पैसे, कपडे मिळतील म्हणून येथे आलो आहोत. यावेळी खूप कपडे मिळाले आहेत, असे वच्छा हिने सांगितले.