मुंबई : गुजरातमधील व्यावसायिकाचे मुंबईतून अपहरण करण्यात आल्याचे उघडकीस आले असून व्यावसायिकाच्या मुलाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अखेर मुंबई पोलिसांनी अटक केली. आरोपींनी ६८ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती.

वाकोला पोलिसांनी बुधवारी राधेश्याम सोनी (३०), सतीश यादव (३३) आणि धर्मेंद्र रविदास (४०) यांना अटक केली. या तिघांनी कथितरित्या गुजरातमधील कच्छ येथून मुंबईत आलेल्या व्यावसायिक केशवजी चौधरी यांचे २० फेब्रुवारी रोजी अपहरण केले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, या आरोपींनी चांगल्या व्यावसायिक संधीचे आमिष दाखवून चौधरी यांना मुंबईत बोलावले आणि त्यांचे अपहरण केले. अपहरणानंतर आरोपींनी त्यांना एका कार्यालयात ठेवले. हे कार्यालय भाडेतत्त्वावर घेण्यात आले होते. त्यानंतर आरोपींनी संताक्रूझ येथे राहणाऱ्या त्यांचा मुलगा महेश चौधरी याच्याकडे खंडणीची मागणी केली. चौधरी यांचा मुलगा कपड्यांचा व्यवसाय करतो. याच्याकडून एकूण ६८ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. आरोपींनी २५ लाख रुपयांचा पहिला हफ्ता मागितला होता. रक्कम न दिल्यास त्याच्या वडिलांना चाकूने भोसकण्याची धमकी दिली होती. गुजरातमधून निघालेले वडील घरी पोहोचले नाहीत. त्यानंतर त्यांचा मोबाइलही बंद लागत होता. त्यामुळे घाबरलेल्या महेशने सोमवारी पोलिसांत वडिलांच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याला खंडणीसाठी दूरध्वनी आला होता. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश खांडेकर यांनी उपनिरीक्षक सुनील केंगार आणि विशाल पालांडे यांच्या पथकांसह अन्य पोलीस अधिकाऱ्यांना तपास करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी तंत्रज्ञान व खबऱ्यांमार्फत याप्रकरणी माहिती गोळा केली. त्यावेळी आरोपी उत्तर उपनगरात असल्याचे समजले. तेथे एक पोलीस पथक रवाना केले असता चौधरी यांना गोरेगाव परिसरात डांबून ठेवल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकून चौधरी यांची सुटका केली. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, सोनीने सुमारे पाच वर्षांपूर्वी चौधरी यांची भेट घेतली होती आणि त्यांच्याकडे चांगला व्यवसाय व आर्थिक स्थैर्य असल्याची माहिती होती. त्यामुळे त्याने दोन अन्य आरोपींसह त्यांचे अपहरण करून मुलाकडून खंडणी उकळण्याचा कट रचला. सोनीने अन्य दोन आरोपींसोबत हातमिळवणी केली. हे तिघेही कर्जबाजारी होते आणि त्यांना पैशांची अत्यंत गरज होती. मुख्य सूत्रधार असलेल्या सोनीला एका झटक्यात श्रीमंत व्हायचे होते, म्हणूनच त्याने हा अपहरणाचा कट रचून तो अंमलात आणला, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader