मुंबई : बुलेट ट्रेन प्रकल्पांमुळे गुजरात आणि मुंबई या दोघांचाही आर्थिक व सामाजिक फायदा होईल, असा विश्वास गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी बुधवारी व्यक्त केला. तसेच मुंबई देशाची आर्थिक राजधानी असली तरी गुजरात गुंतवणुकीला सर्वाधिक पसंतीचे राज्य असल्याचा दावाही त्यांनी केला.

भूपेंद्र पटेल यांनी बुधवारी मुंबईत ‘व्हायब्रंट गुजरात’ आंतरराष्ट्रीय परिषद २०२४ च्या रोड शोला संबोधित केले. या वेळी त्यांनी दोन दशकांची राज्याची यशोगाथा उद्योग प्रतिनिधी व वाणिज्य दूत यांच्यासमोर मांडली. पुढच्या वर्षी जानेवारीत १० वी व्हायब्रंट गुजरात परिषद होत आहे. ताज हॉटेल येथे पार पडलेल्या परिषदेला ३५० उद्योग प्रतिनिधी आणि  ३५ वाणिज्य दूत उपस्थित होते. रिलायन्सचे मुकेश अंबानी यांच्यासह विविध उद्योगपतींनी पटेल यांची या वेळी भेट घेतली.

हेही वाचा >>> VIDEO: “कधीतरी सरकार बदलतं, आपले लोक आले की कार्यकर्त्यांवरील…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

मुख्यमंत्री पटेल म्हणाले की, २००३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या व्हायब्रंट परिषदेने गुजरात राज्य गुंतवणूकदारांसाठी नावाजलेले ठिकाण बनले. व्हायब्रंट परिषदेच्या यशामुळे गुजरातचा सकल राज्य देशांतर्गत उत्पादन २२.६१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून. राज्याची अर्थव्यवस्था राष्ट्रीय सरासरीपेक्षा १५ टक्क्यांच्या एकत्रित वार्षिक विकास दराने वाढली आहे.

 मुंबईत जसा हिरे बाजार आहे, तसा गुजरातच्या सुरतमध्येही आहे. व्यापार आणि उद्योग दोन्ही राज्यांना एका व्यासपीठावर आणतील, असा दावा पटेल यांनी केला.

महाराष्ट्र आणि गुजरात देशाच्या अर्थव्यवस्थेचे मुख्य स्तंभ आहेत. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सची करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे, त्यासाठी गुजरात वचनबद्ध असल्याचे पटेल म्हणाले. सेमीकंडक्टर उत्पादन, हरित हायड्रोजन, विद्युत वाहने, औषधोत्पादन, वस्त्रोद्योग या क्षेत्रात २०२७ पर्यंत १४ टक्के चक्रवाढ वार्षिक वाढ दर गाठण्याचे गुजरातचे ध्येय आहे, असे मुख्यमंत्री पटेल यांनी स्पष्ट केले.  या वेळी गुजरातचे वित्त आणि ऊर्जामंत्री कनुभाई देसाई, उद्योगमंत्री बलवंतसिंह राजपूत, राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा, मुख्यमंत्र्यांचे मुख्य प्रधान सचिव  के. कैलाशनाथन, गुजरातचे मुख्य सचिव राज कुमार आदी उपस्थित होते. अरविंद लिमिटेडचे कुलीन लालभाई यांच्यासह रिलायन्स इंडस्ट्रीजचे ग्रुप प्रेसिडेंट धनराज नाथवानी, बँक ऑफ अमेरिकाच्या काकू नखाते यांनी गुजरातमधील गुंतवणूकदारांसाठी असलेल्या अनुकूल वातावरणाचे कौतुक केले.