अखेर ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थकांनी पुढाकार घेऊन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा सत्कार १७ मार्चला मुंबईत आयोजित केला आहे. तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांचाही या वेळी सत्कार होणार आह़े प्रदेश नेत्यांनी निरुत्साह दाखविल्याने मुंडे समर्थक, मुंबई अध्यक्ष राज पुरोहित यांनी या सत्काराचे आयोजन केले आहे.
मोदी यांनी गुजरात निवडणुकीत पुन्हा घवघवीत यश संपादन केल्यावर त्यांचा मुंबईत सत्कार आयोजित केला जाईल, असे भाजप नेत्यांनी जाहीर केले होते. गेल्या निवडणुकीतील यशानंतरही सत्कार झाला होता. पण नितीन गडकरी पुन्हा राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत असताना मोदींसह काही ज्येष्ठ नेत्यांनी त्यात आडकाठी आणल्याने त्यांची संधी हुकली. त्यामुळे मोदी यांचा सत्कार मुंबईत कोणी आयोजित करायचा, असा प्रश्न निर्माण झाला व तो लांबणीवर पडला. गडकरी समर्थक काही प्रदेश पदाधिकाऱ्यांनी आयोजनासाठी उत्साह दाखविला नाही. यासंदर्भात ‘लोकसत्ता’ ने काही दिवसांपूर्वी वृत्तही प्रसिध्द केले होते.
त्यांचा सत्कार आता १७ मार्चला सोमय्या मैदानावर आयोजित केला जाणार आहे.

Story img Loader