मुंबई : घाटकोपरमध्ये मांसाहारावरून मराठी विरुद्ध गुजराती भाषकांमध्ये वाद झाला असून या वादामध्ये मनसेने उडी मारली आहे. या घटनेची माहिती मिळताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी सदर सोसायट्यांमध्ये जाऊन आंदोलन केले. याप्रकरणी संबंधितांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी घाटकोपरमधील एका सोसायटीमध्ये मांसाहारावरून मराठी विरुद्ध गुजराती वाद झाला होता. या सोसायटीमध्ये एकूण ४२ कुटुंबे वास्तव्यास असून यापैकी चार कुटुंबे मराठी आहेत. इमारतीतील एका कुटुंबाचा सोसायटी समितीबरोबर वाद झाला होता. या वादादरम्यान त्यांनी मराठी भाषक कुटुंबियांबद्दल अपशब्दांचा वापर केला. तसेच मांसाहारावरूनही मराठी भाषकांबरोबर वाद घालण्यात आला. ही बाब घाटकोपरमधील मनसेच्या काही कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी गुरुवारी या सोसायटीत धाव घेतली. त्यावेळी उभयतांमध्ये बाचाबाची झाली.
या घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे वाद शमला. मात्र याबाबतची चित्रफित समाजमाध्यमांवर पसरली. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. दरम्यान, मांसाहारावरून मराठी भाषकांना हिणवणाऱ्या संबंधित नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेचे राज पार्टे यांनी केली.