उत्तरकाशीतील देवभूमीत चारधाम यात्रा करून आयुष्याची संध्याकाळ समाधानाने व्यतीत करण्याचे बेत आखलेल्या ठाण्यातील गुलाब लक्ष्मीचंद दोशी या ६४ वर्षीय वृद्धेचा बद्रीनाथ येथील प्रलयंकारी पावसात थंडीने कडकडून मृत्यू झाला.
ठाणे रेल्वे स्थानकालगत असलेल्या नवचिंतामणी वसाहतीत रहाणाऱ्या गुलाब दोशी यांनी मृत्यूनंतर देहदानासाठी अर्ज केला होता. चारधामाच्या प्रवासात त्यांना मृत्यूने कवटाळल्याचा विचित्र योगायोग घडला आहे. विशेष म्हणजे, रविवारी त्यांचा मृत्यू होताच प्रतिकूल हवामानामुळे त्यांचे पार्थिव ठाण्यात आणणे शक्य नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी बद्रीनाथच्या पायथ्याशी दोशी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे देहदानाची त्यांची शेवटची इच्छाही अपूर्णच राहिली आहे.
विषानिमा ज्ञाती मंडळातर्फे या वर्षी चारधाम यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. गुलाब दोशी पती आणि नातेवाईकांसह या यात्रेस रवाना झाल्या होत्या. रविवारी बद्रीनाथ येथे ढगफुटीतून स्वतचा बचाव करण्याच्या धडपडीत गुलाब दोशी पूर्णपणे भिजल्या. या काळात निसर्गाच्या थैमानामुळे तेथे मदतकार्यही उपलब्ध नव्हते.
मुसळधार पाऊस, थिजविणाऱ्या थंडीने ६४ वर्षीय गुलाब दोशींना गाठले आणि कुडकुडतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात्रेला निघालेल्या आई-वडिलांशी संपर्क होत नसल्यामुळे दोन दिवस अस्वस्थ असलेल्या ठाण्यातील दोशी कुटुंबीयांना मंगळवारी सायंकाळी आपल्या आईच्या निधनाची बातमी कळली आणि त्यांच्यावर आभाळ कोसळले.