पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपा, शिंदे गटासह महाविकासआघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही घटकपक्षांनी ताकद लावली. मात्र, काँग्रेसमध्ये बंडखोरीही पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीसांना मविआतून छुपी मदत मिळाल्याचीही चर्चा आहे. याविषयी शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारलं असता त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ते गुरुवारी (२ फेब्रुवारी) मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
गुलाबराव पाटील म्हणाले, “जनता कुणाबरोबर आहे हे पदवीधर लोकांनी दाखवून दिलं आहे. एकीकडे शिंदे-फडणवीस सरकार शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतंय. त्यावर शेतकरी खूश आहेत. दुसरीकडे शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी शिक्षकांसाठी चांगले निर्णय घेतले. त्यावर शिक्षक खूश आहेत. आता पदवीधरांचं मन कुठं आहे हे निकालातून दिसत आहे.”
“कुणी कितीही आरडाओरडा केला, तरी जनता आमच्या पाठिशी”
“कुणी कितीही आरडाओरडा केला, कल्लोळ केला, तरी जनता आमच्या पाठिशी आहे हे सिद्ध झालं. हा आमचा पहिला विजय आहे आणि आमची बोहणी झाली आहे. त्यामुळे पुढे आमचं चांगलं काम होईल.”
हेही वाचा : ज्योतिषाकडे भविष्य पाहिल्यावरून राज्यात घमासान, शरद पवारांपासून एकनाथ शिंदेंपर्यंत कोण काय म्हणालं? वाचा…
“आता आमच्या सर्व छुप्या गोष्टी बाहेर येत आहेत”
महाविकासआघाडीतून तुम्हाला छुपी मदत झालीय का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता गुलाबराव पाटील म्हणाले, “आता आमच्या सर्व छुप्या गोष्टी बाहेर येत आहेत. त्या गोष्टी यापुढेही येतील.”