भक्ती परब

तरुण वर्गाचा संगीत ओढा ओळखून मुंबई विद्यापीठात अभ्यासक्रम

‘अपना टाइम आयेगा’ असे म्हणत गल्लीगल्लीतून हिपहॉप करणाऱ्या तरुणवर्गाचा ओढा ओळखून मुंबई विद्यापीठाने चक्क ‘हिप-हॉप’ प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. येत्या जूनपासून या अभ्यासक्रमाची पहिली तुकडी दाखल होणार असून ‘हिप-हॉप’ला केवळ हौस म्हणून नव्हे तर करिअर म्हणून त्याकडे पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमातून शास्त्रोक्त प्रशिक्षण मिळणार आहे.

‘अपना टाइम आयेगा’ असे म्हणत गल्लीगल्लीतून अंडरग्राऊंड हिप-हॉप संस्कृती जोपासणाऱ्या तरुणाईने आपल्या अभिव्यक्तीसाठी हे माध्यम निवडले. त्यातून अनेक रॅपर्स घडले. यांच्यापासून प्रेरणा घेत आता हजारो रॅपर्स मुले समाजमाध्यमांचा आधार घेत ही कला शिकत होते. मुंबईत सुमारे २५ हजारांच्या आसपास अंडरग्राऊंड रॅपर्स आहेत. इथल्या प्रत्येक झोपडपट्टीत अशी मुले आढळतात. यातील १० मुलांपैकी ७ मुले रॅपर व्हायचे स्वप्न उराशी बाळगून आहेत, असे धारावीत राहणाऱ्या अल्पेश करकरे या मुलाने सांगितले. विद्यापीठात हिप-हॉप अभ्यासाच्या स्वरूपात उपलब्ध झाल्याने अशा मुलांसाठी संधीची नवी कवाडे खुली झाली आहेत.

‘‘आंतरराष्ट्रीय स्तरावरील रॅपर्स आणि हिप-हॉपचे जाणकार तज्ज्ञ हा अभ्यासक्रम शिकवतील. भारतातील लोकप्रिय रॅपर्स या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहतील,’’ अशी माहिती विद्यापीठाचे साहाय्यक यतींद्र इंगळे यांनी दिली.

अभ्यासक्रम असा..

* हिप-हॉप संस्कृतीत एकूण ९ प्रकार आहेत. त्यातील ग्राफिटी, डीजेईंग, बी-बॉइंग आणि रॅप हे लोकप्रिय प्रकार आहेत. हे लक्षात घेऊन विद्यापीठाने अभ्यासक्रमाची रचना केली आहे.

* हिप-हॉप संस्कृतीचा उदय, इतिहास, प्रकार, जागतिक स्तरावर त्याचे स्थान, भविष्यकाळ अशा अनेक पैलूंचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता येईल.

* अभ्यासक्रम प्रात्यक्षिकासहित शिकवला जाणार असल्यामुळे मुलांना यात गोडी वाटेल.

* बारावीनंतरचे विद्यार्थी या अभ्यासक्रमाला पात्र असून पाच हजार एवढे शुल्क भरून शनिवार-रविवार या दिवशी शिकवणी वर्ग असेल.

* हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर संगीतकार, संगीत निर्माते, इव्हेंट डीजे, आर्टिस्ट मॅनेजमेंट, मार्केटिंग आणि प्रमोशन, सोशल मीडिया डेव्हलपमेंट, लेखक, रेडिओ, टीव्ही आणि वेब सीरिज होस्ट असे करिअर पर्याय त्यांच्यासाठी खुले होतील. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Story img Loader