‘अशाच एका बेटावर’ या मराठी चित्रपटाबाबत वाद
एका निर्मनुष्य बेटावर नऊ अनोळखी माणसे एकत्र येतात आणि एक एक करून त्यांचा खून होत जातो, या संकल्पनेवर आधारित ‘अशाच एका बेटावर’ या मराठी चित्रपटाला ‘गुमनाम’ या हिंदी चित्रपटाच्या निर्मात्यांनी नोटीस बजावली आहे. ही संकल्पना आपल्या चित्रपटाची असून सृष्टी फिल्म्स या मराठी निर्माता कंपनीने याबाबत आपली परवानगी घेतलेली नाही, असे या नोटिशीत म्हटले आहे. मात्र ही संकल्पना ‘गुमनाम’कर्त्यांची नसून इंग्रजी रहस्यकथा लेखिका अगाथा ख्रिस्ती यांची आहे, असा युक्तिवाद चित्रपटाचे दिग्दर्शक संजू हिंगे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.
आगाथा ख्रिस्ती यांनी चाळीशीच्या दशकात लिहिलेल्या ‘अ‍ॅण्ड देन देअर वेअर नन’ या कादंबरीवर याच नावाने इंग्रजी चित्रपट आला होता. त्यानंतर १९६५मध्ये राजा नवाथे या मराठी दिग्दर्शकाने हिंदी चित्रपटसृष्टीत याच कादंबरीतील कथानकावर आधारित ‘गुमनाम’ हा रहस्यपट बनवला. आता सृष्टी फिल्म्स निर्मित ‘अशाच एका बेटावर’ या मराठी चित्रपटातही याच कथानकाचा आधार घेण्यात आला आहे. मात्र ‘गुमनाम’च्या निर्मात्यांनी या मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवून संकल्पनेबाबत परवानगी न घेतल्याचा ठपका ठेवला आहे. मात्र, ही संकल्पना आगाथा ख्रिस्ती यांची असून त्यावर इतर कोणाचाही हक्क नाही. पण तरीही आमच्या निर्मात्यांची बोलणी सुरू आहेत, असे हिंगे यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा