भारतीय शास्त्रीय संगीतातील विविध घराण्यांतील कलाकारांना एकत्र घेऊन रंगणाऱ्या गुणीदास संगीत संमेलनाचे ३६ वे वर्ष संस्मरणीय ठरणार आहे. यंदा ६ ते ८ डिसेंबर या दरम्यान नेहरू केंद्राच्या सभागृहात होणाऱ्या या संमेलनात संगीत मरतड पं. जसराज, उस्ताद राशिद खान, आरती अंकलीकर-टिकेकर, पं. अजय पोहनकर, पं. सतीश व्यास अशा दिग्गज कलाकारांसह बेंगळुरूचा युवा बासरीवादक एस. आकाश हा देखील आपली कला सादर करणार आहे.
पहिल्या दिवशी, ६ डिसेंबर रोजी मेवाती घराण्याच्या कलाकार आणि प्रख्यात व्हायोलीन वादक कला रामनाथ यांच्या वादनाने संमेलनाची सुरुवात होईल. त्यानंतर त्याच दिवशी उस्ताद राशिद खान यांचे गायन सादर होईल. विविध घराण्यांच्या गायकीचा मिलाफ ज्यांच्या आवाजात सहजपणे दिसून येतो अशा आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या सुमधुर गायनाने संमेलानाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात होईल. याच दिवशी युवा बासरीवादक एस. आकाश याचे बासरीवादन होईल. या दिवसाचा समारोप पं. अजय पोहनकर यांच्या गाण्याने होणार आहे. खयाल आणि ठुमरी गायनावर प्रभुत्त्व असलेले पं. अजय पोहनकर आज देशातील प्रमुख कलाकारांपैकी एक आहेत.
संमेलनाच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात मिलिंद चित्तल यांच्या गायनाने होणार असून त्यानंतर प्रख्यात संतूर वादक पं. सतीश व्यास यांचे संतूर वादन होणार आहे. संमेलनाचा समारोप पं. जसराज यांच्या गायनाने होणार आहे. महाराष्ट्र कला निधी या संस्थेतर्फे सादर होणाऱ्या या कार्यक्रमाद्वारे दिवंगत कलावंत पं. जगन्नाथबुवा पुरोहित उर्फ गुणीदास यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते.

Story img Loader