वकील गुणरत्न सदावर्ते यांनी रविवारी (८ मे) एसटी महामंडळाच्या बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात रणशिंग फुंकण्याची घोषणा केली आहे. एसटी महामंडळाच्या बँकेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित संघटनेची सत्ता आहे. या संघटनेच्या विरोधात सदावर्तेंनी घोषणा केलेली संघटना निवडणूक लढणार आहे. त्यामुळे सदावर्तेंच्या राजकीय एन्ट्रीची ही पहिली पायरी तर नाही ना असा प्रश्न आता विचारला जातोय.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “बँक ही सहकार क्षेत्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक व्यक्ती, एक पद याप्रमाणे बँक, मत आणि उमेदवारीची प्रक्रिया निश्चित केलीय. बँक कोणाच्या बापाच्या घरची नाही. बँकेत कोणाला भ्रष्टाचार करण्यास मोकळीक दिलेली नाही. त्यामुळे एसटी महामंडळातील कष्टकरी स्वतः स्वतःची माणसं निवडतील. आतापर्यंत राजकीय बॉसकडून शेतातील बुजगावण्याप्रमाणे लोकं उभी केली जात होती.
“कष्टकऱ्यांना १४-१५ टक्के व्याजाने पैसे देऊन शोषण”
“राजकीय पुढाऱ्यांचे बुजगावणे कष्टकऱ्यांना १४-१५ टक्के व्याजाने पैसे देऊन शोषण करतात. हेच बुजगावणे इतर राज्यांना ७-८ टक्के व्याजाने पैसे द्यायचे. आमची बँक, आमचा पैसा, आमचे कष्ट, आमचे श्रम आणि पैसा मर्जीतील लोकांना दिला जायचा. इतर राज्यांना ७ टक्क्याने पैसे दिले जातात तर इकडे ७ टक्क्याने पैसे का दिले जात नाहीत, हे आमचं म्हणणं आहे,” असं गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितलं.
हेही वाचा : गुणरत्न सदावर्तेंची १८ दिवसांनी तुरुंगातून सुटका, बाहेर पडताच म्हणाले, “हम है…”
“आम्ही आमची लढाई विना दारू, विना मटण, विना पैशाची लढू आणि एसटी बँकेवर आमचा ध्वज फडकावतील,” असंही सदावर्तेंनी नमूद केलं.