वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या तोडफोडीनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे यांच्या अटकेची मागणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “हल्लेखोरांना आणि मनोज जरांगेंना आज मला प्रश्न विचारायचा आहे की, तुमच्या शांततामय आंदोलनाची हीच व्याख्या आहे का? मला गप्प केलं जाऊ शकत नाही. माझा लढा या देशातील ५० टक्के खुल्या जागा वाचवण्याचा आहे. या देशाला जातीपातीत तोडलं जाऊ नये यासाठी माझा लढा आहे.”

व्हिडीओ पाहा :

“माझ्या कष्टाच्या आणि घामाच्या कमाईचं नुकसान”

“माझ्या कष्टाच्या आणि घामाच्या कमाईचं त्यांनी नुकसान केलं आहे. त्यांनी यापूर्वी ३२ कर्मचाऱ्यांना विनाकारण मारहाण केली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांवर कारण नसताना कारवाई करण्यात आली. मला अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या जात होत्या,” असा आरोप गुणरत्न सदावर्तेंनी केला.

“मुलगी आणि पत्नीला उचलून नेण्याच्या धमक्या”

“माझी मुलगी झेन मागील ८ दिवसांपासून शाळेत जात नाही. कारण झेन आणि जयश्री पाटील यांना मारण्याच्या आणि उचलून नेण्यापर्यंतच्या धमक्या आहेत. सामान्यांच्या ५० टक्के जागा वाचवत असल्याने आम्हाला त्रास दिला जाईल, आमच्यावर हल्ले होतील, अशा धमक्या स्पष्टपणे दिल्या जात होत्या,” असंही सदावर्तेंनी नमूद केलं.

हेही वाचा : “सुनील कावळेंच्या आत्महत्येला पूर्णपणे सरकार जबाबदार, आता…”; मनोज जरांगे आक्रमक

“पोलिसांच्या समक्ष हल्ला, माझ्या घरातही येण्याचा प्रयत्न”

सदावर्ते पुढे म्हणाले, “मी जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो तेव्हा त्यांनी स्वतः माझ्यासमोर संयुक्त पोलीस आयुक्तांना फोन कॉल केला होता. त्यानंतरही कॅबिनेट मंत्र्यांना माझ्यासमोर डीसीपी चिमटे यांना फोन कॉल केला होता. हे सांगण्याचं कारण म्हणजे माझ्यावर हल्ला होईल याबाबत पोलिसांनाही माहिती होती. त्यांनी पोलिसांच्या समक्ष हल्ला केला, गाड्यांची तोडफोड केली. ते माझ्या घरातही येण्याचा प्रयत्न करत होते, असंही पोलिसांनी मला सांगितलं.”

हेही वाचा : राजगुरूनगरच्या सभेत अचानक मंचावर चढून तरुणाकडून गोंधळाचा प्रयत्न, मनोज जरांगे संतापले

“मला हिंदुराष्ट्र भारतातील सर्वांना सांगायचं आहे की, आता…”

मला हिंदुराष्ट्र भारतातील सर्वांना सांगायचं आहे की, आता वेळ आली आहे. या जातीपाती करून या देशातील विचाराचे आणि गुणवत्तेचे तुकडे केले जाऊ शकतात. हे तुकडे होऊ नये, गुणवंत सुरक्षित राहावेत म्हणून मी लढा देईन. माझी हत्या झाली तरी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी गुणवतांसाठीचा लढा चालू ठेवीन,” असं सदावर्ते यांनी म्हटलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gunratna sadavarte comment on attack on his vehicles mention manoj jarange pbs
Show comments