रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्या याच्या बनावट चकमकीप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या ‘चकमकफेम’ बडतर्फ पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा याची निर्दोष सुटका करण्याच्या निर्णयाला राज्य सरकार आव्हान देणार आहे. तीन आठवडय़ात हे अपील करण्यात येणार आहे.
लखनभैय्या याचा वकील भाऊ रामप्रसाद गुप्ता यांनी शर्मा याला निर्दोष ठरविण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले आहे. त्यावरील सुनावणीच्या न्यायालयाने सरकारकडे शर्माच्या निर्दोष सुटकेविरुद्ध अपील करणार की नाही याची विचारणा केली होती. त्या वेळी शर्माबाबतच्या निर्णयाविरोधात अपील करायचे की नाही याचा राज्याचा विधी व न्याय विभाग अभ्यास करीत असल्याचे सांगत सरकारने निर्णयासाठी तीन आठवडय़ांचा कालावधी मागितला होता.
न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती पी. एन. देशमुख  यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सोमवारी सुनावणी झाली असता सहाय्यक सरकारी वकील हितेंद्र डेढिया यांनी शर्माबाबत कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती दिली. तीन आठवडय़ात हे अपील केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.  
लखनभैय्याचे अपहरण करून त्याची बनावट चकमक करण्यात आल्यावर शिक्कामोर्तब करून सत्र न्यायालयाने गेल्या महिन्यात पोलीस अधिकारी प्रदीप सूर्यवंशी आणि १२ पोलिसांसह एकूण २१ जणांना दोषी ठरविले होते व त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र त्याचवेळी शर्मा याच्याविरुद्ध पोलिसांना एकही थेट वा परिस्थितीजन्य पुरावा सादर करता आला नसल्याचे स्पष्ट करीत त्याची निर्दोष सुटका केली होती. परंतु शर्मा हाच या बनावट चकमकीतील मुख्य सूत्रधार असल्याचा आणि त्याच्याविरुद्ध पुरेसा पुरावा असल्याचा दावा करीत अ‍ॅड्. गुप्ता यांनी शर्मा याच्या सुटकेच्या निर्णयाविरोधात अपील केले आहे.
दरम्यान, कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणी सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला दोषी पोलिसांनीही आव्हान दिले असून न्यायालयाने त्यांचे अपील दाखल करून घेतले.