मुख्य वाणिज्य निरीक्षकांचा अनुकूल अभिप्राय
मध्य रेल्वेच्या कल्याणपुढील रखडलेल्या स्थानकांची कामे मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यात सावरोली स्थानकाच्या सर्वेक्षणानंतर बुधवारी मध्य रेल्वेचे मुख्य वाणिज्य निरीक्षक बी. बी. तपस्वी यांनी गुरवली परिसराची पाहणी केली. या भागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता रेल्वेला आवश्यक उत्पन्न मिळू शकणार आहे. त्यामुळे वाणिज्य विभागही या स्थानकासाठी सकारात्मक असल्याचे तपस्वी यांनी यावेळी स्पष्ट केले.
मध्य रेल्वेच्या टिटवाळा आणि खडवली स्थानकादरम्यान गुरवली गाव आहे. या परिसरातील ३३ गावांमधून सुमारे दीड लाखांहून अधिक लोकसंख्या असून सुमारे ३० हजार उपनगरी रेल्वे प्रवासी आहेत. त्यामुळे १९६६ पासून या भागात रेल्वेला थांबा द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत होती. मात्र अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतरही या स्थानकाला रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. गेल्या पाच वर्षांपासून या भागातील कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या वतीने या स्थानकांची मागणी लावून धरण्यात आली होती. अखेर रेल्वेनेही यास सकारात्मक प्रतिसाद दिला.
बुधवारी रेल्वेचे मुख्य वाणिज्य निरीक्षक बी. बी. तपस्वी यांनी भेट देऊन सर्वेक्षण केले. अपेक्षित उत्पन्न देण्यासाठी हा भाग सक्षम असल्याने या स्थानकाची मागणी पूर्ण होऊ शकणार आहे. हा अहवाल रेल्वेच्या वरिष्ठांकडे पुढील आठवडय़ात पाठवण्यात येणार असून अभियांत्रिकी विभागाने हिरवा कंदील दिल्यानंतर येथील स्थानकाचे काम सुरू होऊ शकणार आहे. १५ डब्यांची लोकल विचारात घेऊन या स्थानकाची निर्मिती केली जाईल, असे उपस्थित अधिकाऱ्यांनी या वेळी स्पष्ट केले आहे. स्थानका-
संदर्भातील रेल्वेच्या या भूमिकेचे रेल्वे प्रवासी संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे.

Story img Loader