गेले काही वर्षे फरार असलेला गुंड गुरु साटम हा पुन्हा सक्रिय झाला असून त्याच्या तीन साथीदारांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने दक्षिण मुंबईतील एका विकासकाकडे २५ लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
दक्षिण मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाला गेल्या काही दिवसांपासून २५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी मोबाईलवर तसेच कार्यालयातील दूरध्वनीवर गुरु साटमच्या नावे जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. सहआयुक्त (गुन्हे) हिमांशू रॉय, अतिरिक्त आयुक्त निकेत कौशिक यांची भेट घेऊन सदर बांधकाम व्यावसायिकाने तक्रार नोंदविली. खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख नीतीन अलकनुरे, संजीव धुमाळ, शशिकांत जगदाळे, सुधीर दळवी  आदींच्या पथकाने तपास करून गुरु साटमचा साथीदार अशोक पाटील याला कॉटनग्रीन रेल्वे स्थानकातून अटक केली. त्याने दिलेल्या माहितीवरून विवेक शिंदे आणि सुहास कदम या दोघांनाही गुरुवारी अटक करण्यात आली.
अशोक पाटील याने यापूर्वी गुंड संभाजी कदम याच्या सांगण्यावरून गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोस्टमनची हत्या केली होती. या गुन्ह्य़ात पाटीलला संभाजी कदमसह अटक झाली होती. १९८९ ते ९६ या काळात ते आर्थर रोड तुरुंगात होते. संभाजी कदम हा गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट दहाच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला होता. खंडणीच्या गुन्ह्य़ात अटक झालेला सुहास कदम हा त्याचा भाऊ असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader