मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत प्रचंड उकाडा सहन करावा लागत आहे. तापमानात घट झाली असली तरी उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. मुंबईत शुक्रवारी सायंकाळी सोसाट्याच्या वारा सुटला होता. तसेच काही भागात पावसाचा शिडकावा झाला. दरम्यान, शनिवारी मुंबईसह ठाणे, पालघर भागात उष्ण वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मागील काही दिवस मुंबई शहर, तसेच उपनगरात असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. याचबरोबर काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे यामध्ये आणखी भर पडत आहे. तापमानात जरी घट झाली असली तरी उकाड्यामुळे मात्र मुंबईकर बैचेन झाले आहेत. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३३.७ अंश सेल्सिअस, तर, सांताक्रूझ केंद्रात ३३.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दोन्ही केंद्रावरील कमाल तापमानात गुरुवारच्या तुलनेत फारसा फरक नव्हता. परंतु, ढगाळ वातावरणामुळे मुंबईत सकाळपासूनच उकाडा सहन करावा लागला. मुंबईतील सीएसएमटी स्थानक परिसर आणि आजूबाजूच्या काही भागात सायंकाळी सोसाट्याचा वारा सुटला होता. यावेळी धुळीचे लोटही पसरले होते. पावसाळी वातावरण झाले होते. काही वेळात वाऱ्याचा वेग कमी झाला. वाऱ्याची द्रोणीय स्थिती असल्याने वेग अधिक होता. यामुळे मुंबईसह उपनगरांतील काही भागात शुक्रवारी सायंकाळी सोसायट्याचा वारा सुटला होता. तर, वांद्रे कुर्ला संकुल, मुलुंड , ठाणे भागात ढगाळ वातावरण झाले होते. मुंबईत शुक्रवारी उष्ण व दमट वातावरण असेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. मात्र, शुक्रवारी हा अंदाज अद्ययावत करुन वादळी वारे तसेच पावसाचा इशारा देण्यात आला होता.
दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर भागात उष्ण वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे या कालावधीत प्रचंड उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. तसेच काहीशी तापमानातही वाढ होईल. गरज असेल तरच घराबाहेर पडा, अशी सूचना हवामान विभागाने केली आहे. गरज नसल्यास दुपारी घराबाहेर जाणे टाळावे.
राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण
राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान आहे. राज्यातील काही भागात मागील काही दिवसांत वादळी पाऊस आणि गारपीटीमुळे नुकसान झाले आहे. पुढील चार दिवस वादळी वाऱ्याला पोषक वातावरण असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड जिल्ह्यांत आणि विदर्भातील भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांत काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कोकणात उष्ण दमट वातावरणाचा अंदाज
कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील चार दिवस उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यावेळी दिवसभर नागरिकांना उकाडा सहन करावा लागणार आहे. तसेच तापमानातही वाढ होण्याची शक्यता आहे. या कालावधीत तापमान ३४ ते ३६ अंतापर्यंत राहील.
काय काळजी घ्यावी
दिवसा उष्णता असल्यास घराच्या खिडक्या आणि दरवाजे काही वेळापुरते बंद करावे. त्यामुळे उष्णता घरात येत नाही.
गडद रंगाचे पडदे वापरावे, त्यामुळे थेट सूर्यप्रकाश रोखला जाईल.
मायक्रोव्हेव, स्टोव्ह आणि ड्रायर यांसारख्या उष्णता निर्माण करणाऱ्या उपकरणांचा वापर कमीत कमी करावा.
भरपूर पाणी प्या.
आवश्यकता असेल तरच दुपारी बाहेर जा.
द्रवपदार्थांचे प्रमाण वाढवा.
तेलकट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
उघड्यावर ठेवलेल्या बर्फाचा वापर करून तयार केलेल्या पेयांचे सेवन करू नये.
उष्णतेचा त्रास झाल्यास काय करावे
संबंधित व्यक्तीला तातडीने थंड ठिकाणी किंवा सावलीमध्ये हलवावे.
शक्य असेल तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घालावा.
पुरेसे पाणी, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रवपदार्थ द्या.