शासनाने बंदी घातलेली असतानाही गुटखा, पानमसाला आणि सुगंधी सुपारी, आदी परराज्यातून छुप्या मार्गाने आणले जात असून, त्याविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई करण्यात आहे. गेल्या वर्षभरात राज्यात तब्बल २१ कोटी रुपयांचा गुटखा आणि पानमसाल्याचा साठा कारवाईत जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त महेश झगडे यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली. तसेच चुकीचे औषध घेतल्याने रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे फार्मसिस्ट नसलेल्या औषधांविक्री दुकानांवर कारवाई करण्याचा पवित्रा घेतला असून, लोकांनीही अशा दुकानांवर बहिष्कार घालून या मोहिमेस पाठबळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
गुटखा, पानमसाला आणि सुगंधी सुपारी आदींवरील बंदीमुळे पानविक्रेत्यांच्या व्यवसायावर परिमाण होत आहे. असे असले तरी, तरुण पिढीच्या आरोग्याचा विचार करता ही बंदी योग्यच आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. गुटखा आणि पान मसाल्याच्या व्यसनामुळे कर्करोगासारखे दुर्धर आजार झालेल्या व्यक्तींच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने राज्य शासनाने त्यावर बंदी घातली. दोन पदार्थाचे मिश्रण करून गुटखा आणि पान मसाला तयार होतो. त्यामुळे या दोन पदार्थावरही बंदी घालण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच अशा पदार्थाचे उत्पादन करणारे कारखाने राज्यात नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. २१ राज्य आणि पाच केंद्र शासित प्रदेशांमध्येही गुटखा आणि पान मसाल्यावर बंदी घालण्यात आली असून, ज्या राज्यात बंदी नाही, तेथून मात्र छुप्या मार्गाने गुटखा राज्यात आणला जात आहे. त्यामुळे अशा राज्यांना आणि रेल्वे अधिकाऱ्यांना पत्र पाठवून महाराष्ट्रात गुटखा आणि पानमसाला आणला जाणार नाही, याची खबरदारी घेण्याची सुचना केल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच ठाणे जिल्ह्य़ात सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आला आहे.

Story img Loader