भाजपा नेते केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज(शुक्रवार) दक्षिण मुंबईत पत्रकारपरिषदेत बोलताना शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. शिवाय, सध्या राज्याच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेचा विषय असलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणेंनी रमेश लटकेंचा मातोश्रीवर उद्धव ठाकरेंकडून अपमान झाला होता, असे म्हटले आहे. यावरही नारायण राणेंनी मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. याप्रसंगी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचीही उपस्थिती होती.
हेही वाचा : Andheri East Bypoll – उद्धव ठाकरेंचा सावध पवित्रा; संदीप नाईक यांचाही उमेदवारी अर्ज दाखल
नारायण राणे म्हणाले, “नितशे राणे काय म्हणाले हे मला नेमकं माहीत नाही, माझं याबाबत त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. पण मला एवढी माहिती होती की रमेश लटके असते तर आज शिंदे गटात असते.” तसेच, अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय होईल. असा विश्वासही राणेंनी यावेळी व्यक्त केला.
तर “वरळी कोणाची नाही, वरळी मुंबईत येते आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भाजपा आणि शिंदे गटाचा आहे. त्यामुळे यांचं आता काही राहिलेलं नाही. आता राज्य गेलं मुंबई गेली आता वरळी आली का? नंतर मातोश्री येईल. दक्षिण मुंबईत भाजपाचाच खासदार असणार आणि मुंबईत शिवसेनेचा एकही खासदार येणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ.” असंही राणेंनी म्हटलं आहे.
आमदार नितेश राणे काय म्हणाले होते? –
“ही निवडणूक एकतर्फी आहे. रमेश लटकेंचं काम कोणीही नाकारणार नाही. पण मातोश्रीमध्ये त्यांचा किती अपमान झाला हे त्यांनी मला अंगणेवाडीसाठी जात असताना विमानतळावर सांगितलं होतं. उद्धव ठाकरे अपमान करतात, फोन उलचत नाहीत, भेटत नाहीत असं त्यांनी सांगितलं होतं. माणूस जिवंत असताना तुम्ही किंमत देत नाही आणि नंतर तुमच्या घाणेरडया राजकारणासाठी कुटुंबाचा वापर करता,” असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केलेला आहे.