राज्यात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम सुरू केल्यानंतर लसीच्या डोसचा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र दिसू लागलं आहे. काही दिवसांपूर्वी राज्याच्या अनेक भागांमधून लसीचे डोस संपल्याच्या तक्रारी देखील आल्या होत्या. काही भागांमध्ये या कारणामुळे लसीकरण देखील काही काळासाठी थांबवण्यात आलं होतं. मात्र, नुकतीच केंद्र सरकारने मुंबईतल्या हाफकिन संस्थेला लस बनवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यात लस निर्मिती करून पुरेसा पुरवठा उपलब्ध करून देणं शक्य होणार आहे. मात्र, त्यावरून आता राजकीय दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सकाळीच केलेल्या एका ट्वीटनंतर हे दावे सुरू झाले आहेत. त्यांच्या ट्वीटवर शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा बालिशपणा असल्याची खोचक टिप्पणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाफकिन संस्थेला भेट देऊन तिथल्या व्यवस्थेची पाहणी केली होती. तसेच, हाफकिनमध्ये लस निर्मितीला परवानगी द्यावी, अशी मागणी देखील केंद्र सरकारकडे केली होती. नुकतीच केंद्राकडून ही परवानगी मिळाली असून हाफकिनमध्ये आवश्यक ती व्यवस्था आणि साधनसामग्री उभारण्यात आल्यानंतर तिथे लस निर्मिती शक्य होऊ शकणार आहे. मात्र, आज सकाळीच संदीप देशपांडे यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे या मुद्द्यावरून नवी चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्रासाठी गुड न्यूज! हाफकीनला लस निर्मितीसाठी परवानगी
राज्य सरकारने जानेवारीतच हाफकिंग ला लस बनवण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव पाठवला होता.पण त्याची परवानगी राजसाहेबांचं पत्र गेल्यावर आली याला म्हणतात “ठाकरे ब्रँड”.करोना काळात “राजकारण” नको म्हणण्याऱ्यानी आभार मानायला हरकत नव्हती.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 17, 2021
काय आहे ट्वीटमध्ये?
या ट्वीटमध्ये संदीप देशपांडे यांनी हाफकिनला राज ठाकरेंच्या पत्रामुळेच परवानगी मिळाली असा दावा केला आहे. “राज्य सरकारने जानेवारी महिन्यातच हाफकिनला लस बनवण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. पण त्याची परवानगी राजसाहेबांचं पत्र गेल्यावर आली. याला म्हणतात ‘ठाकरे ब्रँड’. करोना काळात राजकारण नको म्हणणाऱ्यांनी आभार मानायला हरकत नव्हती”, असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ट्वीटच्या शेवटच्या वाक्यात संदीप देशपांडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर देखील निशाणा साधला आहे.
राज ठाकरेंचेही आभार – महापौर
दरम्यान, या मुद्द्यावरून महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मुख्यमंत्र्यांनी याबाबत पत्रव्यवहार केला होता. त्याबद्दल ते पंतप्रधानांशी संवाद साधत होते. राज ठाकरेंनीही याबाबत पत्रव्यवहार केला. या सगळ्याचा परिणाम चांगला झाला आहे. पण राज ठाकरेंच्या पत्रानंतरच हाफकिनला परवानगी मिळाली, असं म्हणणं बालिश होईल. पंतप्रधानांचा कामाचा व्याप पाहाता राज्याचा प्रस्ताव गेला तेव्हा ते कदाचित शक्य झालं नसेल. पण राज्याच्या काळजीपोटी सगळ्यांनीच प्रयत्न केले. त्याचा एकत्रित परिणाम दिसला. यात श्रेय घेण्याचा प्रश्नच येत नाही”, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.