अफगाणिस्तानच्या दिशेने पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा जोर वाढल्याने व त्याच वेळी पूर्वेकडून वारे सक्रिय झाल्याने महाराष्ट्रासह देशात पाऊस व गारपीट यांचे थैमान सुरू असल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले. बुधवापर्यंत राज्यातील गारपिटीचे प्रमाण कमी होणार असले तरी उत्तर व ईशान्य भारतात पुन्हा पाऊस व बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे.
ईशान्य भारतातही आसाम व मेघालय येथे तसेच सिक्कीमपासून पश्चिम मध्य प्रदेशपर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे या भागातही १७ एप्रिलपर्यंत बर्फवृष्टी व पाऊस कायम राहील, असा अंदाज केंद्रीय वेधशाळेने व्यक्त केला आहे.
जानेवारीपासून महाराष्ट्रासह देशाच्या सर्वच भागांत सुरू असलेला अवकाळी पाऊस व गारपीट यासाठी पश्चिम व पूर्व दिशेने सक्रिय असलेले वारे कारणीभूत असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे.
मार्चनंतर पश्चिमेकडून येत असलेल्या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो, मात्र या वेळी एप्रिलमध्येही सातत्याने वारे येत आहेत. पूर्व दिशेने येत असलेल्या वाऱ्यांचा प्रभावही वाढल्याने देशाच्या विविध भागांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे, असे मुंबई वेधशाळेचे माजी उपमहासंचालक एन. वाय. आपटे यांनी सांगितले. कमी दाबाचे पट्टे निर्माण होणे ही घटना दुर्मीळ नाही, मात्र पश्चिमेकडून उत्तरेकडे येत असलेले वारे व पूर्वेकडून बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे, या दोन्हीकडून मोठय़ा प्रमाणात बाष्प येत असल्याने पाऊस व गारपीट होत आहे. सातत्याने पडत असलेल्या पावसाने हवेतील बाष्पाचे प्रमाणही वाढले आहे. त्यातच तापमान वाढल्याचा एकत्रित परिणाम यामुळे गारपिटीची तीव्रता वाढली आहे, असे मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर म्हणाले.
’गुजरात ते केरळदरम्यान असलेला कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेश ते केरळदरम्यान सरकला. ’मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भासह देशाच्या उत्तरभागापासून दक्षिणेतील तामिळनाडू, केरळ व कर्नाटक येथे मुसळधार वृष्टी सुरू आहे.
’महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गारपीट होत असून उत्तरेत बर्फवृष्टी सुरू आहे. दक्षिण भारतात निर्माण झालेला कमी दाबाच्या पट्टय़ाचा प्रभाव बुधवारी कमी होणार.
’महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील अवकाळी पाऊस आटोक्यात येईल. उत्तरेत १५ एप्रिलपासून पुन्हा पश्चिमी वाऱ्यांचा झंझावात सुरू होण्याचा अंदाज आहे.
’हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ राज्यात पुन्हा बर्फ व पावसाचे सत्र सुरू होईल.