मुंबईतील हाजी अली दर्गा बॉम्बने उडवू, अशी धमकी देण्यात आली आहे. आज सांयकाळी पाच वाजताच्या सुमाराम एका अज्ञात व्यक्तीने फोन करत ही धमकी दिली. त्यानंतर हाजी अली दर्गा प्रशासनाने तत्काळ याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. मुंबई पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत बॉम्बशोधक पथकासह दर्ग्याच्या ठिकाणी धाव घेतली. मात्र, याठिकाणी त्यांना कुठलीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.

एएनआयने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास हाजी अली दर्गा प्रशासनाला एक फोन कॉल आला होता. यावेळी समोरच्या व्यक्तीने त्याचे नाव पवन असल्याचे सांगितलं. त्यानंतर त्याने थेट हाजी अली दर्गा थेट बॉम्बने उडवू अशी धमकी दिली. तसेच शिवीगाळ करत या दर्ग्याबाबत काही आक्षेपार्ह टीपणीही केली.

हेही वाचा – “हाजीअलीला लागलेले पोस्टर्स आणि झेंडे….”, जितेंद्र आव्हाडांचे मुंबई पालिका आयुक्तांना आव्हान!

दरम्यान, याप्रकरणी मुंबईत पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास करत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. खरं तर मुंबईत अशाप्रकारे बॉम्ब स्फोट करण्याची धमकी दिल्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवू, अशी धमकी मुंबई पोलिसांना देण्यात आली होती. या धमकीनंतर पोलीस प्रशासन ताज हॉटेल आणि विमानतळाची पाहणी केली. मात्र, कुठलीही संशयास्पद वस्तू आढळून आली नव्हती.

हेही वाचा – हाजी अली दर्गा परिसरात उभारला जाणार जगातील सर्वात मोठा ध्वजस्तंभ

त्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातही मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवले असल्याचा संदेश मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला होता. तसेच गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यातही अशाच प्रकारचा एक फोनकॉल मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला होता. त्यावेळीही मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली होती.

Story img Loader