मुंबईतील मुस्लिम धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या वरळी येथील हाजी अली दग्र्यातील पुरूष संताची समाधी म्हणजेच ‘मझार’च्या परिसरात महिलांना प्रवेश देणे हे इस्लाम धर्मानुसार पाप आहे. त्यामुळे तेथे महिलांना जाण्यास बंदी घालण्याचा आपला निर्णयावर आपण ठाम असल्याची भूमिका ट्रस्टद्वारे सोमवारी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात स्पष्ट करण्यात आली. त्यामुळे या निर्णयाविरोधात करण्यात आलेली याचिका दाखल करण्याजोगी आहे की नाही यावर आता न्यायालय सुनावणी घेणार आहे. डॉ. नूरजहाँ मिर्झा यांनी ट्रस्टच्या निर्णयाविरोधात याचिका केली आहे. न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती व्ही. एल. अचलिया यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी झाली. त्या वेळी ट्रस्टच्या वतीने पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली. मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने ट्रस्टला या निर्णयाचा फेरविचार करण्याची सूचना केली होती. तसेच याचिकाकर्त्यांचे म्हणणेही ऐकून घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार झालेल्या बैठकीचा अहवाल ट्रस्टतर्फे सोमवारी न्यायालयात सादर करण्यात आला.

Story img Loader