पावसाच्या तडाख्यात मुंबईतील रस्ते जर्जर होत असताना पालिकेच्या संगणक प्रणालीवर मात्र शनिवारी दिवसभरात केवळ ३१० खड्डय़ांची छायाचित्रे उपलब्ध झाली आहेत. २२७ नगरसेवकांनी आपापल्या प्रभागांमधील किमान पाच खड्डय़ांची छायाचित्रे पालिकेने दिलेल्या मोबाइलवर काढून दरदिवशी संगणक प्रणालीवर पाठविली तरी मुंबईतील रस्ते गुळगुळीत होण्यास हातभार लागेल. परंतु मोबाइलवर आलेला फोन घेणे आणि करणे इतकेच ज्ञान असलेले ५० टक्क्यांपेक्षा अधिक नगरसेवक छायाचित्र अपलोड करण्याचे प्रशिक्षण दिले नसल्याचे तुणतुणे वाजवून नगरसेवक हात झटकत आहेत.
गेले काही दिवस पडलेल्या संततधार पावसामुळे मुंबईमधील रस्त्यांची दैना उडाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. द्रुतगती महामार्गावर खड्डय़ांचे अडथळे चुकवित वाहने हाकताना वाहनचालकांची दमछाक होते. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे झटपट बुजविता यावेत यासाठी महापालिकेने संगणक प्रणालीची मदत घेतली आहे. प्रोबिटी सॉफ्टवेअर कंपनीने तयार केलेल्या सॉफ्टवेअरचा त्यासाठी वापर करण्यात येत आहे.
रस्त्यावरील खड्डय़ांचे मोबाइलवर छायाचित्र काढून ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संगणक प्रणालीवर उपलब्ध करण्यात येत आहेत. उपलब्ध छायाचित्रातील खड्डय़ाची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पालिकेचे अभियंते पाहणी करतात आणि ती छायाचित्रे ४८ तासांमध्ये खड्डे बुजविण्यासाठी कंत्राटदारांकडे सुपूर्द केली जातात. खड्डय़ांची छायाचित्रे संगणक प्रणालीवर टाकण्यासाठी रस्ते विभागातील अभियंत्यांना पालिकेने मोबाइल दिले आहेत.
मात्र केवळ एक तासाचे प्रशिक्षण दिल्यामुळे संगणक प्रणालीवर छायाचित्रे अपलोड करता येत नसल्याची तक्रार काही अभियंत्यांकडून करण्यात येत आहे.
महापालिकेने २२७ नगरसेवकांना अलीकडेच अॅन्ड्रॉईड मोबाइल दिले आहेत. या मोबाइलवर खड्डय़ाचे छायाचित्र काढून ते संगणक प्रणालीवर टाकता येते. परंतु आतापर्यंत मोजक्याच नगरसेवकांनी खड्डय़ांची छायाचित्र पालिकेकडे पाठविली आहेत.
२२७ नगरसेवकांनी आपापल्या प्रभागांतील खड्डय़ांची छायाचित्रे पाठविली असती तर आजघडीला हजारो खड्डय़ांची नोद झाली असती आणि ४८ तासांमध्ये खड्डे बुजवून रस्ते गुळगुळीत करता आले असते. पण प्रशासनाने आपल्याला प्रशिक्षणच दिले नाही, त्यामुळे खड्डय़ांची छायाचित्रे पाठविता येत नाहीत, असा तक्रारीचा सूर नगरसेवक आळवत आहेत. त्यामुळे पावसाच्या तडाख्यात दिवसेंदिवस मुंबई खड्डय़ात जात आहे.
एकूण खड्डय़ांची नोंद
छायाचित्रे उपलब्ध – ९४८३
कंत्राटदारांकडे सोपविले – ८४६७
बुजविले – ७१४१
निम्मे नगरसेवक मोबाइल निरक्षर
पावसाच्या तडाख्यात मुंबईतील रस्ते जर्जर होत असताना पालिकेच्या संगणक प्रणालीवर मात्र शनिवारी दिवसभरात केवळ ३१० खड्डय़ांची छायाचित्रे उपलब्ध झाली आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-07-2013 at 02:47 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Half corporators illiterate in mobile usage