उन्हाळा असो वा हिवाळा, प्रत्येक वेळी घाम गाळतच प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना उन्हाच्या झळांपासून दिलासा देण्यासाठी बेस्टने सुरू केलेल्या वातानुकूलित बसगाडय़ांना या गाडय़ांमधील तापमानापेक्षाही थंडा प्रतिसाद मिळाल्याने आता बेस्ट प्रशासनाने आपला पवित्रा बदलला आहे. आतापर्यंत या बसगाडय़ांमधून प्रवास करणाऱ्या १३ वर्षांखालील मुलांसाठीही पूर्ण तिकीट काढावे लागत होते. मात्र तोटय़ात चाललेल्या वातानुकूलित बसमार्गाना पुनरुज्जीवित करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने नमते घेत १३ वर्षांखालील मुलांना अध्र्या दरात तिकीट देण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
बेस्टतर्फे १९९८पासून वातानुकूलित गाडय़ांची सेवा सुरू झाली. त्यानंतर वेळोवेळी या वातानुकूलित बसगाडय़ांमध्ये बदल होत गेले. मात्र गेल्या काही वर्षांपासून बेस्टच्या ताफ्यात असलेल्या ‘निळा डबा’ गाडय़ांबद्दल प्रवाशांमध्ये नाराजी होती. त्यातच टीएमटी आणि एनएमएमटी यांच्या ताफ्यात व्होल्वो कंपनीच्या आरामदायक वातानुकूलित बसगाडय़ा दाखल झाल्यावर बेस्टच्या प्रवाशांनी आपली पसंती त्या गाडय़ांना दिली. त्यामुळे बेस्टच्या वातानुकूलित सेवेला तोटा सहन करावा लागत आहे.
सध्या बेस्टकडून वातानुकूलित बसगाडय़ांचे २३ मार्ग चालवण्यात येत आहेत. मात्र या बसगाडय़ांच्या तिकिटांवर कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. परिणामी या बसने प्रवास करणाऱ्या लहान मुलांनाही प्रौढ प्रवासभाडे द्यावे लागते. त्यामुळे कुटुंबासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लहान मुलांसाठीही पूर्ण तिकीट काढावे लागत असल्याने प्रवाशांनी या बसगाडय़ांकडे पाठ फिरवल्याची शक्यता बेस्ट प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या बसगाडय़ांमध्ये १३ वर्षांखालील मुलांसाठी प्रौढ तिकिटापेक्षा निम्म्या शुल्कात तिकीट देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने बेस्ट समितीसमोर मांडला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास वातानुकूलित बसगाडय़ांना मिळणाऱ्या प्रतिसादात वाढ होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केmu04ला आहे. हा प्रस्ताव बेस्ट समितीने मान्य केल्यावर तो महापालिकेकडे मान्यतेसाठी जाईल. महापालिकेत तो मान्य झाल्यास लहान मुलांसाठी बेस्टचा वातानुकूलित प्रवास ५० टक्क्यांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे.
कसे असेल भाडे
*सध्या बेस्टकडून वातानुकूलित बसगाडय़ांचे २३ मार्ग चालवण्यात येत आहेत
*या बसने प्रवास करणाऱ्या लहान मुलांनाही पूर्ण तिकीट काढावे लागते
*त्यामुळे प्रवाशांची या बसगाडय़ांकडे पाठ आता या बसगाडय़ांमध्ये १३ वर्षांखालील मुलांसाठी प्रौढ तिकिटापेक्षा निम्म्या शुल्कात तिकीट देण्याचा प्रस्ताव