एरवी सोन्याच्या दागिन्यांच्या मोहात पडणाऱ्या महिलांना मकरसक्रांतीच्या सणासाठी हलव्याचेच दागिने हवे असतात. संक्रांतीची खास काळी साडी आणि पांढऱ्याशुभ्र हलव्याचे विविध दागिने अंगावर लेवून मिरवल्याशिवाय ‘संक्रांती’चा सण साजराच होत नाही. नवविवाहितेसाठी तर हल्ली हलव्याचे खास दागिने बनवून घेतले जातात. या वर्षीही मकरसंक्रांतीसाठी हलव्याचे मंगळसूत्र, हार, झुमके, नथ, बांगडय़ा असे पारंपरिक अलंकार दुकांनामध्ये दाखल झाले आहेत. मात्र सध्या पेशवाई पद्धतीच्या हलव्याच्या दागिन्यांना जास्त मागणी आहे.
संक्रांतीत महिलांना हलव्याचे दागिने घालण्याचे जेवढे वेड असते तेवढेच पूर्वी ते दागिने बनवण्याचेही होते. सुरुवातीच्या काळात हे हलव्याचे अलंकार घरोघरी बनवण्याची प्रथा होती. हलव्याचे दागिने बनविणे ही एक कला आहे, पांढऱ्या मोत्यावर साखरेच्या पाकातून तयार केलेल्या हलव्याचे अलंकार घडवणे हे कौशल्याचे आणि चिकाटीचे काम आहे. त्यासाठी बराच वेळही द्यावा लागत असल्याने सध्या हलव्याचे तयार अलंकार विकत घेण्याकडे महिलांचा कल जास्त आहे.
हे हलव्याचे दागिने तयार करून देणाऱ्या आणि ते कसे तयार करावेत, याचे प्रशिक्षण देणाऱ्यांचीही संख्या वाढते आहे. दादरच्या ‘फॅमिली स्टोर्स’च्या चालक कला जोशी गेली ५० वष्रे हलव्यांच्या दागिन्यांचा व्यवसाय करीत आहेत. हलव्याचे दागिने बनवण्यासाठी खूप वेळ देण्याची गरज असते, मात्र आज महिलांना घर सांभाळून अर्थार्जनासाठी नोकरीनिमित्ताने घराबाहेर पडावे लागते. मग घरी बनवण्याऐवजी तयार दागिने खरेदी करण्यावर महिलांकडून जास्त भर दिला जातो त्यामुळेच असे दागिने तयार करणाऱ्या कारागीर महिलांना मागणी वाढली असून दागिने बनविणाऱ्या महिलांची तिसरी पिढी ही व्यवसायात आनंदाने सहभागी होत असल्याचे कला जोशी यांनी सांगितले. हलव्याचे दागिने बनविणाऱ्या या महिला मुख्यत: पुण्याच्या आहेत. हलव्याच्या या दागिन्यांची मागणी वाढली असली तरी त्यात काळानुसार बदलही झाले आहेत. सुरुवातीला काही मोजके दागिने तयार केले जात होते, मात्र या वेळी दागिन्यांचे संच घेण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये मुलीचा, सुनेच्या दागिन्यांचा संच, जावयाचा संच, लहान मुलांच्या दागिन्यांचा संच उपलब्ध असल्याने ग्राहकांना वेगवेगळे दागिने विकत घ्यावे लागत नाहीत. यामध्ये महिलांच्या व लहान मुलांच्या दागिन्यांच्या संचाला बाजारात जास्त मागणी असून या संचाच्या किमती अगदी १००० पासून ते २५०० हजार रुपयांपर्यंत असल्याचे विविध व्यावसायिकांनी सांगितले. पेशवाई पद्धतीच्या दागिन्यांना सध्या जास्त मागणी आहे. मंगळसूत्र, कंबरपट्टा, बाजूबंद, हार, मोहनमाळ, मेखला, पाटल्या, तोडे, अंगठी, नथ, कर्णफुले, वेणी, छल्ला आदींचा त्यात समावेश आहे. तर यंदा पुरुषांसाठी हलव्याचा मोबाइलही बाजारात पाहायला मिळत आहे. मकरसंक्रांतीच्या सणासाठी हलव्याच्या दागिन्यांची ही प्रथा जोपासताना कलेला प्रोत्साहनही मिळते आहे आणि बाजारपेठही उपलब्ध झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा