मुंबई : लांबपल्ल्याच्या गाडय़ांना स्वतंत्र मार्ग मिळावा, यासाठी मुंबई सेन्ट्रल ते बोरिवली दरम्यान पाचवी, सहावी मार्गिका आकाराला येत आहे. या मार्गिकेसाठी विलेपार्ले येथील रेल्वे वसाहतीची जागाही लागणार आहे. या वसाहतीमधील नऊ इमारती पाडण्यात येणार असून यातील चार इमारतींचे पाडकाम हाती घेण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वेने एमयूटीपी २ (मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट) अंतर्गत मुंबई सेन्ट्रल ते बोरिवली दरम्यान पाचव्या, सहाव्या मार्गाचे काम हाती घेतले आहे. २००८ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. १३ वर्षे उलटल्यानंतरही प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. झोपडय़ांचे अतिक्रमण, खासगी जमिनींचे भूसंपादन व अन्य तांत्रिक अडचणींमुळे प्रकल्पाचे काम रखडले होते. तर करोनाकाळातही या कामाला गती मिळाली नाही. या मार्गिकेचा विस्तार करण्यासाठी विलेपार्ले येथील रेल्वे वसाहतींचीही जागा लागणार असल्याची माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. विलेपार्ले येथे नऊ इमारतींसह एकूण १०२ घरे आहेत. यातील ९९ घरे रिकामी करण्यात आली आहेत. नऊ इमारतींपैकी सात इमारती आतापर्यंत रिकाम्या करण्यात आल्या आहेत. तर पश्चिम रेल्वेने चार इमारती पाडण्याचे काम हाती घेतले आहे. ३० एप्रिलपर्यंत सर्व वसाहती पाडण्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे काम पूर्ण होताच रुळांसह अन्य कामे हाती घेण्यात येणार आहेत. माहीम रेल्वे स्थानकावरील हार्बर रेल्वेचे जुने फलाट पाडण्याचे कामही पूर्ण झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा