मुंबई : लहान मुलांच्या हात-पाय-तोंडाला (हॅण्ड-फूट-माऊथ) होणाऱ्या विषाणूजन्य संसर्गाचे प्रमाण मुंबई, ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात वाढले असून याचे स्वरूपही दरवर्षी बदलत असल्याचे दिसून येत आहे. याची लक्षणे मंकीपॉक्ससारखी असल्यामुळे पालक चिंताग्रस्त असल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी नोंदविले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हात-पाय-तोंड हा विषाणूजन्य संसर्ग असून या आजारामध्ये हात, पाय आणि तोंडाजवळ पुरळ येऊन मुलांना ताप येतो. यामध्ये तोंडामध्ये अल्सरदेखील होतो. पावसाळ्यात ज्याप्रमाणे विषाणूजन्य संसर्गाची बाधा होऊन ताप,सर्दी, खोकला होतो, त्याचप्रमाणे हा संसर्गदेखील पावसाळ्यात उद्भवतो. मागील सात ते आठ वर्षांपासून हा संसर्ग दर पावसाळ्यात मुलांमध्ये होत असल्याचे आढळले आहे.

हात-पाय-तोंड या विषाणूजन्य आजारांची लागण झालेल्या बालकांचे प्रमाण मागील महिनाभरात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दिवसाला तीन – चार बालके याची बाधा झाल्याने उपचारासाठी येत आहेत. या आजाराचे प्रमाण वाढले असले तरी हा संसर्गजन्य आजार फारसा तीव्र नाही. बालकांमध्ये मध्यम स्वरुपाची लक्षणे आढळत आहेत. तसेच चार ते पाच दिवसांमध्ये बालके बरेही होत असल्याचे आढळते असे संसर्गजन्य आजाराच्या तज्ज्ञ डॉ. तनु सिंघल यांनी सांगितले.

हात-पाय-तोंड या विषाणूजन्य आजारांचे प्रमाण गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या वर्षी निश्चितच वाढले आहे. विशेष म्हणजे या आजारामध्येही मंकीपॉक्सप्रमाणे अंगावर फोड येत असल्यामुळे पालक चिंताग्रस्त होत आहेत. तसेच कांजण्यांमध्येही अशीच लक्षणे दिसत असल्यामुळेही पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. या आजारात मुलांना फारसा त्रास होत नाही. परंतु काही बालकांमध्ये तोंडामध्ये जर आल्याने खाण्याची इच्छा नसते. बालकांना जेवण जात नाही. त्यामुळे अशक्तपणा येतो. शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होते. मात्र तरीही धोकादायक अशी लक्षणे अजून तरी कोणत्याही बालकांमध्ये आढळलेली नाहीत, असे ठाण्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप केळकर यांनी स्पष्ट केले.

मागील दोन वर्षांमध्ये बालके शाळेत गेली नव्हती. परंतु आता शाळा सुरू झालेल्या असल्यामुळे याचा प्रसार बालकांमध्ये जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे देखील प्रमाण वाढले असण्याची शक्यता आहे, असे डॉ. सिंघल यांनी सांगितले.

दहा वर्षापासून हा आजार आपल्याकडे आढळत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये यात अनेक बदलही होत आहेत.  हाफकिनच्या मदतीने आम्ही २००९ साली संशोधन केले होते. त्यावेळी बालकांच्या नमुन्यांची तपासणी केली होती. यामध्ये कॉकसॅकी या विषाणूमुळे याची बाधा होत असल्याचे आढळले होते. पूर्वी हा आजार पाच वर्षाखालील बालकांमध्ये आढळत होता. परंतु गेल्या काही वर्षामध्ये सात ते आठ वर्षाच्या बालकांमध्ये बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच एका बालकाला लागण झाल्यानंतर १५ दिवसांनी पुन्हा लागण होत असल्याचेही आढळले आहे. त्यामुळे या विषाणूमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये काय बदल झाले आहेत, याची पुन्हा तपासणी करणे गरजेचे आहे, असे डॉ. केळकर यांनी सांगितले. सर्वसाधारपणे हा संसर्ग सप्टेंबर महिन्यामध्ये दिसून येत असे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये जुलैमध्ये याची लागण झाल्याच्या तक्रारी घेऊन रुग्ण येत आहेत.

आजाराची लक्षणे : तळपाय, तळहात, कोपर, गुडघा, पार्श्वभाग आदी ठिकाणी पुरळ येणे, फोडामध्ये पाणी होणे, तोंडामध्ये अल्सर होणे, ताप येणे. कांजिण्यांमध्ये येणारे फोड हे वेगळ्या प्रकारचे असतात. कांजण्यांचे फोड हे प्रामुख्याने पाठ आणि पोटावर येतात. हात-पाय-तोंडाच्या संसर्गामध्ये हात, पाय, ढोपर येथे पुरळ येते.

उपचार – या आजारासाठी वेगळे उपचार नाहीत. लक्षणांप्रमाणे उपचार केले जातात. तापासाठी पॅरासिटामॉल आणि फोड आल्यामुळे दुखत असल्यास तशी औषधे दिली जातात. तसेच फोडांसाठी मलम, तोंडातील ज्वरासाठी औषधे दिली जातात. ही लक्षणे चार ते पाच दिवसांमध्ये बरी होतात. काही बालकांमध्ये जास्तीत जास्त आठवडाभर असतात.

घ्यावयाची काळजी

संसर्गजन्य आजार असल्याने इतर मुलांना होण्याची शक्यता असते. त्यामुळे आजार पूर्ण बरा होईपर्यंत मुलांना शाळेत पाठवू नये. पुरळामुळे खाज येत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने मलम वापरावे. तोंडामध्ये अल्सर आल्याने मुलांना खाता येत नाही. अशावेळी पातळ पदार्थ किंवा जास्त चावावे लागणार नाहीत असे हलके पदार्थ द्यावेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hand foot mouth infections children anxiety parents monkeypox symptoms mumbai print news ysh