मुंबईत रेल्वे अपघातांत दररोज सरासरी १७ प्रवासी मृत्युमुखी पडतात. पण त्यापैकी निम्म्यांच्या नशिबी बेवारस मृतदेह असा दुर्दैवी ठपका बसतो. ज्यांनी अशा अपघातग्रस्तांची काळजी घ्यायची, त्यांची बेपर्वाई आणि लालसाच याला कारणीभूत असल्याचे विदारक वास्तव पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. अपघातात दगावणाऱ्या अनेक प्रवाशांची ओळख पटविणाऱ्या चीजवस्तूच गायब केल्या जात त्यांच्यावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार केले जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मुंबईच्या उपनगरी रेल्वेप्रवासात गेल्या १० वर्षांत ३० हजार प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे, तब्बल ३५ हजार प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व आले, तर अनेक कुटुंबांचा आधार हरपला. मात्र, रेल्वे प्रशासनाचा भाग असलेल्या सुरक्षा यंत्रणांच्या संवेदना मात्र, रोजच्या या मृत्युकांडामुळे कोरडय़ा झाल्या आहेत. अपघातग्रस्त प्रवाशांना पहिल्या तासाभरात योग्य उपचार मिळाले, तर मृत्यूचा हा भीषण आकडा कमी होऊ शकतो, पण रेल्वेची संबंधित यंत्रणा नेमका हाच वेळ दिरंगाईत घालविते, आणि अनेक दुर्दैवी जीव उपचाराविना तडफडत अखेरचा श्वास घेतात..
समीर झवेरी नावाचा एका लढवय्या गेली अनेक वर्षे रेल्वे अपघातग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी या निर्ढावलेल्या यंत्रणेविरुद्ध झगडत आहे. वयाच्या १६ व्या वर्षी झवेरी यांनी आपले दोन्ही पाय रेल्वे अपघातात गमावले, पण या अपंगत्वामुळे त्यांना अपघातग्रस्तांच्या बाजूने लढय़ाची नवी जिद्द मिळाली, आणि हा माणूस अन्यायाच्या विरोधात उभा राहिला. रेल्वे अपघातग्रस्तांना न्याय मिळावा, यासाठी न्यायालयाचे खेटे घालू लागला, माहिती अधिकारासारखी आयुधे वापरून त्याने अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी नवा लढा सुरू केला. या लढाईत झवेरी यांच्या हाती आलेली माहिती धक्कादायक आणि माणुसकीच्या संवेदना किती बोथट झाल्या आहेत, याची साक्ष देणारी आहे. मनीलाईफ फाऊंडेशन नावाच्या संस्थेत झवेरी यांनी शनिवारी आपल्या लढय़ाचा पट उलगडताना या यंत्रणेच्या बेपर्वाईचे असंख्य नमुने सांगितले, तेव्हा उपस्थितांच्या अंगावर शहारे उमटले..  

Story img Loader