अपंगांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ संघटनेने महात्मा गांधी जयंतीच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी टर्मिनसवर बुधवारी सायंकाळी धडक मारून ‘रेल रोको’ आंदोलन केले. संघटनेचे कार्यकर्ते रुळांवर उतरून उपनगरी गाडय़ांपुढे ठाण मांडून बसल्याने वाहतूक १७ मिनिटे ठप्प झाली. पोलिसांनी त्यांना हटविल्यावर वाहतूक पुन्हा सुरू झाली. या दरम्यान चार सेवा रद्द करण्यात आल्या. तर पुढील अर्धा तास उपनगरीय सेवा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. गर्दीच्या वेळी हे आंदोलन न झाल्याने प्रवाशांना त्याचा फटका बसला नाही.
अपंगांना केवळ ६०० रुपये असलेले मानधन अपंगत्वानुसार दोन ते चार हजार रुपयांपर्यंत वाढवावे, घरकुल योजनेत सर्व अपंगांना घर मिळावे, लाभार्थीना दारिद्रय़रेषेखालची अट ठेवू नये, अपंगांच्या विवाहांना अर्थसाहाय्य देण्यात यावे, यासह १८ मागण्या संघटनेने सरकारकडे केल्या आहेत. संघटनेने नुकतेच मंत्रालयातही घुसून आंदोलन केले होते. तरीही निर्णय न झाल्याने संघटनेने बुधवारी आझाद मैदानावर आंदोलन आयोजित केले होते. सकाळपासून आंदोलन करूनही मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या दिवशी, गुरुवारी भेटण्याची वेळ दिल्याने संघटनेचे कार्यकर्ते वैतागले. त्यांनी आझाद मैदानावरून निघून पोलिसांना चकवा देत सीएसटी स्थानकात बैठक मारली. त्यामुळे पोलिस व रेल्वेपोलिसांची तारांबळ उडाली. सीएसटीमधील पुढील भागात चार-पाच हजार कार्यकर्ते घोषणाबाजी करू लागले. त्यामुळे पोलीस बंदोबस्त मोठय़ा प्रमाणावर वाढवावा लागला. अपंगांना व संघटनेच्या कार्यकर्त्यांना कसे हटवावे, असा पेच पोलिसांपुढे होता.
काही कार्यकर्त्यांनी पावणेपाचच्या सुमारास उपनगरी गाडय़ांपुढे उतरून वाहतूक अडविण्यास सुरुवात केली. एक ते सहा क्रमांकांच्या फलाटांवर धाव घेऊन आंदोलन सुरू केल्याने पोलिसांनी लगेच कारवाई सुरू केली आणि त्यांना हटविले. या आंदोलनामुळे चार गाडय़ा रद्द कराव्या लागल्या आणि १५ गाडय़ांना फटका बसला. गांधी जयंतीची सार्वजनिक सुटी असल्याने या आंदोलनाचा फटका प्रवाशांना फार मोठय़ा प्रमाणावर बसला नाही.
शेवटी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहीर यांना चर्चेसाठी सीएसटीला पाठविले. त्यांनी सायंकाळी उशिरापर्यंत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. या आंदोलनानंतर आता गुरुवारी ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत. या भेटीत अपंगांच्या मागण्या मान्य होतील, असे ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांनी सांगितले. या आंदोलनाचा प्रवाशांना त्रास व्हावा, असा कोणताही हेतू नव्हता. सरकार दरबारी वारंवार चर्चा आणि बैठकांनंतरही मागण्यांची तड लागत नसल्याने हे पाऊल उचलावे लागल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.
आमदार बच्चू कडू यांची विचित्र आंदोलने
* अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी विचित्र पद्धतीने यापूर्वीही आंदोलने करून सरकारला चांगलेच अडचणीत आणले होते. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार कडू हे २००५च्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात पाण्याच्या टाकीवर चढून बसले. सरकारने प्रश्न मान्य केल्याशिवाय टाकीवरून खाली उतरणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला, पण हे महाशय पाण्याच्या टाकीवरून खाली उतरण्यास तयार नव्हते. शेवटी तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील आणि तत्कालीन पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख हे दोघे आमदार कडू यांची समजूत काढण्याकरिता चक्क पाण्याच्या टाकीवर चढून गेले होते.
* अमरावती जिल्ह्यात विविध प्रश्नांवर मोर्चे काढ, आंदोलन कर हे त्यांचे नेहमीच सुरू असते. गेल्याच वर्षी अमरावती जिल्ह्यातील वादग्रस्त वीज प्रकल्प रद्द होईपर्यंत विधानसभेत अंगात शर्ट न घालता फक्त बंडीवर बसणार, असे जाहीर करून आमदार कडू यांनी शर्ट भिरकावून दिला होता. मात्र अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी अंगात शर्ट नसल्यास सभागृहात बसू देणार नाही, अशी ताकीद दिल्याने आमदार कडू यांना माघार घ्यावी लागली होती़
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा