कसाबला फाशी दिली हे बरे झाले. पण कायदेशीर प्रक्रिया अधिक जलदगतीने होऊन यापूर्वीच फाशी द्यायला हवी होती.. प्रियांका देशमुख हिने ही प्रतिक्रिया दिली आणि वाक्य पूर्ण होत असतानाच या हल्ल्यात शहीद झालेल्या वडिलांच्या आठवणींनी तिचा संयमाचा बांध फुटला.
प्रियांका निलेश देशमुख (२७) आता डोंबिवलीत सारस्वत बँकेत काम करतात. चार वर्षांपूर्वी २६ नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यावेळी रेल्वे पोलिसांत असलेले तिचे वडील मुरलीधर चौधरी छत्रपती शिवाजी टर्मिनसवर कामावर होते. अजमल कसाब व त्याच्या साथीदाराच्या गोळीबारात ते शहीद झाले. प्रियांका लग्नानंतर आता डोंबिवलीतच राहते. सकाळी ती कामावर निघण्याची तयारी करत असताना आईचा फोन आला ‘कसाबला फाशी दिली.’ बातमी ऐकल्यावर तिला समाधान वाटले. पण हल्ल्याला चार वर्षे होत असताना आता फाशी दिली याचे फारसे कौतुक वाटले नाही. न्यायालयीन प्रक्रिया आणखी जलदगतीने पार पाडून लवकर फाशी दिली गेली असती तर आनंद वाटला असता, असे प्रियांकाना ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. कसाबच्या फाशीच्या निमित्ताने आपल्या कुटुंबावर कोसळलेला दुखाचा डोंगर, वडिलांच्या आठवणी तिच्या मनात दाटून आल्या. अश्रू अनावर झाले.    

Story img Loader